आरटीओवर आरसी बुकचा बोजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 08:27 PM2018-04-14T20:27:00+5:302018-04-14T20:27:00+5:30
वाहनाची मालकी दर्शविणारे कागदपत्र म्हणजे आरसी बुक. पुर्वी ते कागदाच्या स्वरुपात दिले जात होते. आता स्मार्टकार्ड स्वरुपात आरसीबुक दिले जाते. बऱ्याच वाहनमालकांना दिलेल्या पत्त्यावर आरसी कार्ड मिळतच नाहीत.
पुणे : तुम्ही वाहन विकत घेतले आणि नोंदणीची कागदपत्रे (आरसी बुक) तुम्हाला काही महिने झाल्यानंतरही मिळाली नसतील तर ती नक्कीच टपाल विभागाच्या कार्यालयीन प्रणालीत अथवा प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) कार्यालयात सापडतील. दरवर्षी सरासरी १५ हजार आरसीबुकचे टपाल आरटीओकडे पत्ता सापडत नसल्याच्या कारणाने माघारी जात आहेत. विशेष म्हणजे आरटीओ कार्यालयात परत गेलेली यातील निम्मी कागदपत्रेही वाहनचालक घेऊन जात नाहीत. परिणामी आरटीओ कार्यालयावर या आरसी प्रमाणपत्रांचा बोजा पडत आहे.
वाहनाची मालकी दर्शविणारे कागदपत्र म्हणजे आरसी बुक. पुर्वी ते कागदाच्या स्वरुपात दिले जात होते. आता स्मार्टकार्ड स्वरुपात आरसीबुक दिले जाते. बऱ्याच वाहनमालकांना दिलेल्या पत्त्यावर आरसी कार्ड मिळतच नाहीत. दरवर्षी तीन ते सव्वातीन लाख आरसी कार्ड आरटीओ कार्यालयाकडून वितरीत केली जातात. त्यातील वर्षाला सरासरी १५ हजार कार्ड संबंधित वाहनमालकांपर्यंत पोहोचतच नाहीत. विशेष म्हणजे यातील निम्मे वाहनमालक देखील आपल्याला अशी कागदपत्रे मिळाली नसल्याबाबत आरटीओ कार्यालयाकडे चौकशी करताना दिसत नाहीत.
आरटीओला २०१५-१६ ते २०१६-१७ या तीन वर्षांत ४४ हजार ३७९ आरसीबुक टपाल विभागाने परत पाठविले. यातील केवळ १८ हजार ८९४ वाहनचालकांनी आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून आरसी प्रमाणपत्र घेऊन गेले आहेत. आरटीओकडे तीन वर्षांची तब्बल २५ हजार ४८३ कार्ड वा नोंदणी प्रमाणपत्र पडून आहेत. त्यापुर्वीची देखील हजारो कागदपत्रे पडून असल्याचे आरटीओतील अधिकाऱ्यांनी सांगितले. आरसी बुक हा मालकीचा पुरावा असतो. वाहन दुसऱ्याला विकायचे असल्यास मालकी हस्तांतरणासाठी याचा उपयोग होतो. असे असूनही, वाहनमालक आरसी प्रमाणपत्र बाळगण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
------------------------
वाहन परवान्यावर नागरीक व्यवस्थित पत्ता देतात. त्यामुळे वाहन परवाना त्यांना व्यवस्थित मिळतो. मात्र, वाहन वितरकाकडे योग्य पत्ता न नोंदविल्याने नागरिकांना आरसी बुक मिळत नाहीत. अशी अनेक कागदपत्रे टपाल कार्यालयाने आरटीओकडे परत पाठविली आहेत.
संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
----------------------------
आरसीबुकची वर्षनिहाय संख्या
साल वितरण संख्या परत आलेले टपाल कार्यालयातून वितरण झालेली संख्या
२०१५-१६ ३,४३,८७३ २०,२७२ ८,१३७
२०१६-१७ २,७४,१०३ ८,४५८ ६,५७१
२०१७-१८ ३,४८,६७९ १५,६४९ ४,१८८