दौंड तालुक्यात इच्छुकांचे लॉबिंग
By admin | Published: January 24, 2017 01:40 AM2017-01-24T01:40:28+5:302017-01-24T01:40:28+5:30
दौंड तालुक्यात इच्छुकांचे मुलाखतीचे पर्व संपले आहे. इच्छुकांनी तिकिटांसाठी लॉबिंग सुरू केले आहे. आपापल्या पक्षनेत्याकडे
केडगाव : दौंड तालुक्यात इच्छुकांचे मुलाखतीचे पर्व संपले आहे. इच्छुकांनी तिकिटांसाठी लॉबिंग सुरू केले आहे. आपापल्या पक्षनेत्याकडे शिष्टमंडळ नेऊन दबावतंत्र सुरू केले आहे. आमदार राहुल कुल यांनी ६ जिल्हा परिषद गटांत मेळावे
घेऊन इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे येथे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असल्या, तरी दररोज थोरात यांच्या खुटबाव येथील निवासस्थानी इच्छुक उमेदवार शक्तिप्रदर्शन करीत आहेत.
भाजपाचे वासुदेव काळे व नामदेव ताकवणे यांच्याकडेही या वेळी इच्छुकांची संख्या वाढल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसने चौफुला येथे २७ इच्छुकांच्या मुलाखती तालुकाध्यक्ष पोपटराव ताकवणे यांनी घेतल्या आहेत. काही उमेदवारांना प्रचार सुरू करण्यास सांगितले आहे. तालुक्यातील मोठ्या प्रमाणात असणाऱ्या माळी, धनगर समाजाची एकत्र मोट बांधून ओबीसी पर्व मैदानात उतरवण्याचा चंग कुल-थोरात यांच्यावर नाराज असणाऱ्या नेत्यांनी बांधली आहे. या मोहिमेला कितपत यश मिळते, हे येणारा काळच ठरवणार आहे.
याशिवाय, रासपा व भाजपा यांची युती होणार असल्याचे सूतोवाच आमदार कुलांनी केले आहे. पालकमंत्री गिरीश बापट यावर तोडगा काढतील, अशी अपेक्षा आहे. काँग्रेस आघाडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी अनुकूल असल्याचे मत पोपटराव ताकवणे यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या वैशाली नागवडे यांची उमेदवारी
राहू-खामगाव गटातून अंतिम आहे. इतर इच्छुकांचा मात्र उमेदवारीसाठी जीव टांगणीला लागला आहे. केडगाव, बोरीपार्धी, मलठण गणांतून संभाव्य आगामी सभापती निवडला जाणार असल्याने इच्छुक वाढले आहेत. प्रचारासाठी वेळ कमी असल्याचे कारण पुढे करून स्वंयघोषित उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी, सोशल मीडियावर आपला प्रचार सुरू केला आहे. एकूणच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक चुरशीची होणार, असे चित्र आहे. (वार्ताहर)