पुणे : जिल्ह्यात प्रामुख्याने सह्याद्रीच्या डोगरकपारीत उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वणवे लागण्याचे प्रकार वाढत आहे. फेब्रुवारीअखेर व मार्च, एप्रिल महिन्यात हे प्रमाण अधिक असते. वणवे लागण्याचे प्रकार प्रामुख्याने स्थानिक लोकांच्या चुकामुळे अधिक आहे. या पार्श्वभूमीवर वणवे लागल्यास स्थानिक लोकांना जबाबदार धरण्यात येणार असून, वणवे टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश वन विभागाने सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत. याबाबत घोडेगाव वन परिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी घोडेगाव, शिनोली, तळेघर, तिरपाड व कानसे आदी भागातील सरपच आणि ग्रामसेवक यांना जंगल, रोपवन भागाला लागणारे वणवे टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भांत लेखी पत्र दिली आहेत. याबाबत महाजन यांनी सांगितले की, उन्हाळ्यात वणवा लागण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढत आहे. या आगीत अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी प्राणी, त्यांची अंडी, घरटी जळून खाक होतात. अंडी, व घरटी जळाल्याने अनेक पक्षी त्या आगीत प्राणाची आहुती देतात. अनेक वेळा स्थानिक लोकांकडून पावसाळ््यात गवत चांगले यावे म्हणून वणवे लावले जातात, तर काही जण विडी, सिगारेट पेटवून टाकतात, तर काहीजण हौस म्हणून, शेतातील पालापाचोळा जाळण्यासाठी आग लावतात.तर अनेक वेळा शेतातील, जंगलातील झाडांवर असणारे मधमाश्याचे पोळे काळण्यासाठी अग लावली जाते. उन्हाळ््यामध्ये लागणारे वणवे टाळण्यासाठी जंगल क्षेत्र व रोपवन परिसराच्या हद्दीलगत असणा-या शेतक-यांनी आपल्या शेतामध्ये बांध पेटविताना, राण भाजताना जवळच्या वन अधिका-यांना कळविल्याशिवाय आग, विस्तव पेटवू नये, तसे न केल्यास व सावधगिरीच्या उपाय- योजना के केल्यास संबंधित व्यक्तीला एक वर्षांची कैद व दोन हजार रुपयांचा दंड करण्यात येईल. तसेच जंगलाची नुकसान भरपाई देखील द्यावी लागले. बांध पेटविल्यानंतर संपूर्ण आग विझविल्या शिवाय आपल्या मालकीचे क्षेत्र सोडून जावू नये, आगीपासून जंगल संपत्तीचे संरक्षण व निसगर्आचा समतोल राखण्यासाठी मदत करावी, आपल्या परिसरातील जंगल क्षेत्रास आग लागल्यास त्वरीत संबंधित वन अधिका-यांच्या निदर्शनास आणावे व मदत करावी, आग लावणा-या व्यक्तींचे नाव वन विभागास कळवावे, असे आवाहन महाजन यांनी केले आहे.
वणवे लागल्यास स्थानिक लोकांना जबाबदार धरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 10:00 PM
वणवे लागण्याचे प्रकार फेब्रुवारी अखेर व मार्च, एप्रिल महिन्यात हे प्रमाण अधिक
ठळक मुद्देवणवे टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे वन विभागाचे आदेशघोडेगाव, शिनोली, तळेघर, तिरपाड व कानसे आदी भागातील सरपंच आणि ग्रामसेवक यांना पत्र