लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अन्न अधिकार अभियानाने ‘हंगर वॉच’ अंतर्गत महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नंदुरबार, सोलापूर, पालघर, नाशिक आणि धुळे या ९ जिल्ह्यांतील वंचित आणि उपेक्षित समाजाच्या अन्नसुरक्षेची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. लॉकडाऊन काळात अन्नाची पोषण गुणवत्ता कमी झाल्याचे मत ६८ % व्यक्तींनी नोंदवले. त्यापैकी ३०% लोकांनी पोषण गुणवत्ता ‘खूपच वाईट’ असल्याचे नोंदवले आहे. कमी उत्पन्न गटांवर लॉकडाऊनचा परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. ६०% पेक्षा अधिक व्यक्तींनी लॉकडाऊनपूर्वीच्या तुलनेत अन्नाचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे किंवा बरेच कमी झाले असल्याचे नोंदवले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, देशाच्या विविध भागातील वंचित आणि उपेक्षित समाज घटकाची भुकेची परिस्थिती जाणून घेण्यासाठी अन्न अधिकार अभियानाने सप्टेंबर २०२० मध्ये अभ्यास केला. यासाठी या जिल्ह्यांतील २५० लोकांचा अभ्यासात समावेश करण्यात आला.
लॉकडाऊन संपल्याच्या पाच महिन्यांनंतरही भुकेची परिस्थिती गंभीर असल्याचे ‘हंगर वॉच’च्या प्राथमिक निष्कर्षांवरून दिसून येते. ९६ टक्के लोकांंचे रोजगार व व्यवसायाचे नुकसान झाले. उत्पन्न कमी झाल्याने ६३ टक्के लोकांच्या आहारातून धान्याचे, तर ७१ टक्के लोकांच्या आहारातून डाळी खाण्याचे. ७६ टक्के लोकांच्या आहारातून भाज्यांचे प्रमाण कमी झाले. ६८ टक्के लोकांनी त्यांची पोषणस्थिती खालावल्याचे नमूद केले. अन्नधान्य खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यायची गरज पडल्याचे ४९ टक्के लोकांनी नोंदवले.
अभ्यासात सहभागी लोकांपैकी सुमारे ४३% लोकांना एप्रिल-मे मध्ये कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नव्हते. एप्रिल-मे मध्ये कसलेही उत्पन्न नसलेल्यांपैकी ३४% लोक हे नोकरी व स्वयंरोजगार गमावल्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये देखील कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळवत नव्हते. लॉकडाऊनपूर्वीच्या तुलनेत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये उत्पन्न कमी झाल्याचे ९०% पेक्षा जास्त लोकांनी नोंदवले आहे.
चौकट
उसनवारी, दागदागिने व जमीन विक्रीत वाढ
सुमारे ४९% व्यक्तींनी लॉकडाऊनपूर्वीच्या तुलनेत अन्नासाठी पैसे उसने घेण्याची गरज वाढल्याचे सांगितले. १२% लोकांनी भूक भागविण्यासाठी आणि आरोग्याच्या समस्येवर उपाययोजनेसाठी दागिने विकल्याची नोंद आहे. आणखी १२% लोकांच्या मते, त्यांच्याकडे दागिने असते, तर त्यांनी ते सर्व विकले असते असे नोंदवले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ३% लोकांनी लॉकडाऊन दरम्यान त्यांची जमीनदेखील विकली.