लॉकडाऊनमध्ये राधिकाची तब्बल २५-३० पोपटांशी जमली गट्टी - तिची पहाट होते पक्ष्यांच्या सुमधूर आवाजाने; नैसर्गिक खाद्यच त्यांना देते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:13 AM2021-08-23T04:13:51+5:302021-08-23T04:13:51+5:30
पुणे : लॉकडाऊनमध्ये ती घरीच असल्याने तिला बाल्कनी आणि खिडकीत पक्षी येत असल्याचे जाणवले. वर्क फ्रॉम होम सुरू होते ...
पुणे : लॉकडाऊनमध्ये ती घरीच असल्याने तिला बाल्कनी आणि खिडकीत पक्षी येत असल्याचे जाणवले. वर्क फ्रॉम होम सुरू होते आणि घरातच २४ तास राहत असल्याने पक्ष्यांची ये-जा करण्याची वेळ तिला समजली आणि तिने मग त्यांना खाण्यासाठी धान्य ठेवले. त्यांना तिचा एवढा लळा लागला की, आता ती त्या पोपटांना हाताने भरवते. राधिका सोनवणे असे तिचे नाव असून, तिची २५ ते ३० पोपटांशी चांगलीच गट्टी जमली आहे.
कर्वेनगर परिसरात राधिका राहत असून, तिच्या खिडकीत आणि बाल्कनीमध्ये पोपट, बुलबुल, खारूताई, चिमणी येतात. राधिकाने एमबीए केले असून, सध्या म्युच्युअल फंड असिस्टंट मॅनेजर म्हणून ती कार्यरत आहे.
राधिका म्हणाली, ‘‘लॉकडाऊनपूर्वी देखील एक-दोन पोपट बाल्कनीत येत होते. पण त्यांच्याकडे फारसे लक्ष गेले नाही. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये मात्र त्यांची संख्या वाढली. रोज पहाटे साडेसहा वाजता त्यांचे येणं सुरू होते आणि साडेसात वाजेपर्यंत ते राहतात. त्यांचा हा दिनक्रम मी पाहिला. त्यानंतर मी सकाळी उठून त्यांना धान्य, फ्रूट, पाणी ठेवू लागले. त्यामुळे हळूहळू त्यांना माझी ओळख झाली. एकदा माझ्या हाताने त्यांना भरवले तेव्हा तर माझ्यासाठी गगन ठेंगणे झाले. माझ्या बाल्कनीच्या समोर खूप झाडी आहे. त्यावर बसतात आणि माझ्या खिडकीत, बाल्कनीत येतात. सुरुवातीला दोन-तीन पोपट होते. पण नंतर त्यांची संख्या वाढली.’’
‘‘पोपटांना पाहून सर्व ताण निघून जातो. त्यामुळे मी सकाळी साडेसहा वाजता त्यांची वाट पाहत असते. एक-दोन पोपट तर माझे खूप खास बनले आहेत. ते माझ्याकडून खाऊन घेतात. मी त्यांचे निरीक्षण करते, तेव्हा अनेक गोष्टी समजल्या. त्यांचे डोळे, शेपूट, रंग यावरून मी त्यांना ओळखू लागले. घरातच पक्षीनिरीक्षणाचे धडे मला मिळाले. ’’
—————————————-
अनेक जण म्हणतात की, पक्ष्यांना खाऊ देऊ नये. पण मी त्यांना कोणतेही शिजवलेले अन्न देत नाही. त्यांना फक्त त्यांचेच खाद्य देते. जसे की धान्य, पेरू वगैरे. जे नैसर्गिक खाद्य आहे, तेवढेच त्यांना देत असते. कारण इतर काही दिले तर त्यांची तब्येत बिघडू शकते.
- राधिका सोनवणे, पक्षीप्रेमी
———————————————-
चिमणी पिल्लाला घेऊन बाल्कनीत भरवते...
पोपटांसोबत चार-पाच खारूताई देखील येऊ लागल्यात. एक चिमणी तर तिच्या पिल्लाला घेऊन बाल्कनीत आली होती. तिला मी ठेवलेले तांदूळ घेऊन ती भरवत होती. हा प्रसंग माझ्यासाठी आनंदाचा सर्वोच्च बिंदू होता. एक बुलबुल पण तिच्या पिल्लाला घेऊन आली होती. हे सर्व पाहून माझे आयुष्य खूप आनंदाने भरून गेले आहे, असे राधिका म्हणाली.
—————————-