लॉकडाऊनचे निर्बंध होताहेत शिथिल; पुण्यातून जिल्ह्याच्या अनेक भागात बससेवा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 11:09 PM2020-08-08T23:09:22+5:302020-08-08T23:14:55+5:30
जिल्ह्यातही तालुके व महत्वाच्या ठिकाणांहून बस सोडण्यात येणार
पुणे : लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथील केले जात असल्याने पुणे शहरातून जिल्ह्याच्या अनेक भागात एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातही तालुके व महत्वाच्या ठिकाणांहून बस सोडण्यात येणार आहेत. या बससेवा प्रामुख्याने कार्यालयीन वेळांनुसार असणार आहे. अद्यापही बसला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी प्रशासनाने मागील आठवड्यात पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकातून मुळशीसाठी तर शिवाजीनगर येथून शिरूर व आळेफाटा या मार्गावर बस सुरू केली होती. त्यानंतर टप्प्याटप्याने मार्ग वाढविले जात आहेत. प्रवाशांची मागणी व प्रतिसादानुसार त्यामध्ये बदल केला जात आहे. एसटीने सुरू केलेल्या प्रमुख मार्गांमध्ये बारामती, भोर, शिरूर, सासवड, नारायणगाव, राजगुरूनगर, इंदापुर, दौंड, निरा, जुन्नर, आळेफाटा, भिमाशंकर, वेल्हा, पौड या ठिकाणांहून थेट पुण्यासाठी बस असेल. सकाळी या ठिकाणांहून पुण्याकडे बस निघतील. तर याच बस संध्याकाळी पुण्याहून संबंधित ठिकाणी जातील. या बस सर्व थांब्यावर थांबतील. बससाठी कार्यालयीन वेळ निवडण्यात आली आहे. तिकीटदर पुर्वीप्रमाणेच असणार आहे.
कोरोना संकट विचारात घेऊन सुरक्षित अंतर राखण्यासाठी निम्म्याच प्रवाशांना बसमध्ये प्रवेश दिला जात आहे. तसेच मास्क बंधनकारक असून ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना बसमध्ये प्रवेश दिला जात नाही. या प्रवासासाठी ई-पासची गरज नाही, असे एसटीच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले.
--------------
पुणे शहर व जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले मार्ग -
पुण्यात ये-जा : बारामती, भोर, शिरूर, सासवड, नारायणगाव, राजगुरूनगर, इंदापुर, दौंड, निरा, जुन्नर, आळेफाटा, भिमाशंकर, वेल्हा, पौड.
इतर मार्ग : बारामतीहून निरा, भिगवण, इंदापुर, वालचंदनगर, दौंड. तळेगाव-चाकण-शिक्रापुर. नारायणगाव-जुन्नर, जुन्नरहून देवळे, तांबे, दावडी, अंबोली, भिवाडे, घोडेगाव. भोरहून म्हसर, धोंडेवाडी, टिंटेघर, कोर्ले. सासवडहून यवत, वीर, राख, निरा. राजगुरूनगरहून पाबळ, बहिरवाडी, वांद्रा, वाडा, भोरगिरी, चिंचोशी, दावडी, साबुर्डी. मंचरहून कारखाना, कुरवंडी, चास-घोडेगाव, अवसरी.
----