लोक प्रबोधन ही पत्रकारांची जबाबदारी : माधव गोडबोले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 08:12 PM2019-12-17T20:12:20+5:302019-12-17T20:12:35+5:30
आज समाजजीवनामध्ये झुंडशाहीची मोठी भीती निर्माण
पुणे : सरकार जेव्हा अडचणीत येते, तेव्हा अयोध्यासारखे विषय मुद्दाम शोधून काढले जातात़. त्यामुळे भारताच्या इतिहासातील अयोध्या हे शेवटचे प्रकरण ठरणार नाही. तर यापुढे मथुरासारखी प्रकरणे येऊ शकतात. अशावेळी लोकांचे प्रबोधन करणे, ही पत्रकारांची जबाबदारी असल्याचे मत निवृत्त केंद्रीय गृह व न्याय सचिव माधव गोडबोले यांनी व्यक्त केले़
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त ''अयोध्या प्रश्न आणि माध्यमे'' या विषयावर गोडबोले बोलत होते. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे, खजिनदार सुनील जगताप उपस्थित होते. यावेळी संघाच्यावतीने आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा तसेच पत्रकारिता व अन्य क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवलेल्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला़
गोडबोले म्हणाले, देशासमोर अयोद्धा हे एकच प्रकरण असल्याचे चित्र निर्माण केले गेले. अशावेळी न्यायालयाचा निर्णय लोकांपर्यंत कसा जातो हे महत्त्वाचे असते. अयोध्येत करण्यात येणारी कारसेवा फक्त प्रतिकात्मक (सिंबॉलिक) आहे व यास प्रसिद्धी द्या, असे न्यायालयाने प्रत्यक्ष सांगितले होते़. मात्र, जमलेल्या लोकांना असे वाटले, की सर्वोच्च न्यायालयाने कारसेवेला परवानगी दिली आहे. कारसेवकांनी पुलिस हमारे साथ है, बडी खुशीकी बात है, अशा घोषणा देत मशीद पाडली. आज समाजजीवनामध्ये झुंडशाहीची मोठी भीती निर्माण झाली आहे.
लिबरहान आयोगाच्या अहवालानुसार ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत घडलेली घटना ही पूर्णत: पूर्वनियोजित होती. ज्या क्षणी मशिदीवर हल्ला करण्यात आला, त्याचक्षणी वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांवर हल्ले करण्यात आले. पत्रकारांनी घटनेचे केलेले व्हिडिओ व व्हाईस रोकॉर्डिंग नष्ट करण्यात आले. पत्रकारांवरील हल्ल्यांची तक्रार घटनास्थळी उपस्थित भाजपा नेते लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी यांच्याकडे करूनही त्यांनी काही केले नाही. अयोध्या घटना लोकशाहीतील दैवदुर्विलास म्हणावी लागेल असेही गोडबोले म्हणाले़
भारतामध्ये लोकशाहीसाठी सर्वोत्तम काम पंडित नेहरूंनी केले आहे़ त्यांनी विचार स्वातंत्र्याशी बांधिलकी जपत १७ वर्षे कारभार केला. २२ डिसेंबर १९४९ रोजी अयोध्येतील मशिदीमध्ये जेव्हा राममूर्ती ठेवण्यात आल्या, तेव्हा हा विषय इतका मोठे रूप धारण करेल असे वाटले नव्हते़ असेही गोडबोले यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद कुलकर्णी यांनी केले, आभार चंद्रकांत हंचाटे यांनी मानले़ सूत्रसंचालन लक्ष्मण मोरे व तनिष्का डोंगरे यांनी केले़
-----------