पुणे : ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर, कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले आणि महाराष्ट्र राज्य प्रसारमाध्यम व वृत्तपत्रे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष ‘लोकमत’चे मुंबईतील विशेष प्रतिनिधी यदू जोशी यांना ‘दर्पण जीवन सन्मान पुरस्कार’ जाहीर झाला आहे.महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या ‘दर्पण’ पुरस्कार उपक्रमास या वर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने रौप्यमहोत्सवी ‘दर्पण’ पुरस्कार व विशेष ‘दर्पण जीवन सन्मान’ पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्रदिनी १ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते व भारती विद्यापीठाचे कार्यवाह, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. नवी पेठेतील श्रमिक पत्रकार भवनात होणाºया या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ असतील, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी दिली. ज्येष्ठ स्तंभलेखक भाऊ तोरसेकर (मुंबई), दैनिक नवशक्तीचे (मुंबई) संपादक सुकृत खांडेकर, ज्येष्ठ पत्रकार व जलनितीतज्ज्ञ सुधीर भोंगळे यांना पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल ‘दर्पण जीवन सन्मान पुरस्कार’ देण्यात येणार आहेत.मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पहिले स्मारक त्यांच्या जन्मगावी पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे १९९३ साली संस्थेच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने उभे राहिले आहे. गरजू पत्रकार व त्यांच्या कुटुंबीय यांच्यावरील आपद्प्रसंगी तातडीने आर्थिक सहकार्य, तरुण व होतकरू पत्रकार यांचेसाठी अभ्यास कार्यशाळा आदी उपक्रम संस्थेच्या सहकार्याने राबविले जातात.
‘लोकमत’चे विजय बाविस्कर, वसंत भोसले, यदू जोशी यांना ‘दर्पण जीवन सन्मान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 6:42 AM