लोणावळ्यात बुधवारी २४ तासांत विक्रमी ३९० मिमी पाऊस; सर्वत्र पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 08:59 AM2021-07-22T08:59:21+5:302021-07-22T09:05:11+5:30

Heavy Rains : जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. अनेक घरांमध्येही शिरलं पाणी.

Lonavala receives record 390 mm of rain in 24 hours on Wednesday Water everywhere | लोणावळ्यात बुधवारी २४ तासांत विक्रमी ३९० मिमी पाऊस; सर्वत्र पाणीच पाणी

लोणावळ्यात बुधवारी २४ तासांत विक्रमी ३९० मिमी पाऊस; सर्वत्र पाणीच पाणी

Next
ठळक मुद्देजोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. अनेक घरांमध्येही शिरलं पाणी.

लोणावळा : लोणावळा शहर व खंडाळा परिसराला पावसाने बुधवारी दिवसरात्र अक्षरशः झोडपून काढले आहे. बुधवारी (21 जुलै) रोजी 24 तासात लोणावळा शहरात विक्रमी 390 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पाऊस व वारा यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. काही रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. 

लोणावळ्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अवघ्या तीन ते चार तासात शहर व परिसरात 150 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. भांगरवाडी, खत्री पार्क, कुसगाव, जुना खंडाळा भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

खत्री पार्क येथील एका बंगल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही नागरिक घरात आडकले होते. शिवदुर्ग रेस्कू पथकाने पहाटे या सर्वांना घरातून सुरक्षित बाहेर काढले आहे. भांगरवाडी येथील पांढरे यांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. अनेक साहित्य पाण्यावर तरंगत आहे. वलवण गावातील द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली मोठे पाणी साचले आहे. जुना खंडाळा गेट नं. 30 भागात पाणी साचले आहे. कुसगाव परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. भांगरवाडी, नांगरगाव, खत्री पार्क, जुना खंडाळा, रोहिदासवाडा, तुंगार्ली या भागात पाण्याचा रात्री विळखा पडला होता. सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर पाणी ओसरू लागले आहे. काही रस्त्यांवर आजुनही पाणी आहे.

बुधवारी रात्री 12 ते गुरुवारी पहाटे चार दरम्यान साधारण 150 ते 175 मिमी पाऊस झाल्याचा अंदाज टाटा कडून वर्तविण्यात आला आहे. ही ढगफुटी सदृश्य परिस्थिती आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असल्याने पाणी काही प्रमाणात ओसरू लागले आहे. लोणावळा नगरपरिषद आपत्कालीन पथक व शिवदुर्ग रेस्कू टिम रात्रभर मदतीचे काम करत आहे. पावसाच्या सोबत जोरदार वारा वाहत असल्याने शहरातील विविध भागातील विज गेली आहे. काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांनी घराबाहे जाणे टाळावे तसेच कोणत्या भागात पाणी साचले असल्यास त्या भागातील नागरिकांनी लोणावळा नगरपरिषदेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात इंद्रायणी नदीला पुर आला असून नदीपात्रातील पाणी सर्वत्र पसरले आहे. वाकसई, कार्ला, मळवली, बोरज भागात नदीचे पाणी पसरले आहे. भाजे घरकूल परिसराला प‍ाण्याचा विळखा पडला आहे.

Web Title: Lonavala receives record 390 mm of rain in 24 hours on Wednesday Water everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.