लोणी काळभोरला साडेतीन लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 11:35 PM2017-09-17T23:35:53+5:302017-09-17T23:36:00+5:30
अवैध दारू नेणा-या संशयित टेम्पोचा बीट मार्शलनी (रात्रगस्त) सिनेस्टाइल पाठलाग केला. शेवटी चालकांनी टेम्पो सोडून पळ काढला.
लोणी काळभोर : येथे अवैध दारू नेणा-या संशयित टेम्पोचा बीट मार्शलनी (रात्रगस्त) सिनेस्टाइल पाठलाग केला. शेवटी चालकांनी टेम्पो सोडून पळ काढला. या टेम्पोची पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात ३५ लिटरच्या ३८ प्लॅस्टिक कॅनमध्ये १ हजार ३३० लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळाली. पोलिसांनी टेम्पोसह दारू, असा एकूण ३ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिट मार्शल पोलीस नाईक संदीप देवकर व संतोष शिंदे हे दोघे पुणे-सोलापूर महामार्गावर कवडी पाट टोलनाका ते उरुळी कांचन परिसरात रात्री गस्त घालत होते. या वेळी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील प्रयागधाम फाटा येथे पहाटे ३-३० वाजण्याच्या सुमारास एक संशयित टेम्पो पुण्याकडे जाताना त्यांना दिसला. यातून मादक द्रव्यांचा वास येत असल्याने त्यांनी टेम्पोचालकाा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने टेम्पो न थांबवता भरधाव वेगात नेला. देवकर व शिंदे यांनी दुचाकीवरून पाठलाग सुरू केला. संशयित टेम्पो कवडीपाट टोलनाका येथे थांबेल याचा अंदाज आल्याने तेथील कर्मचा-यांना वाहन क्रमांक कळवून टेम्पो थांबवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यानुसार टोलनाक्यावरील कर्मचा-यांनी बॅरिकेड लावले. दरम्यान मार्शल दुचाकी व टेम्पोमध्ये चार ते पाच फुटांचे अंतर राहिले असताना चालकाने विरुद्ध बाजूने गाडी घालून दुचाकीस भरधाव वेगात कट मारून बॅरिकेड तोडून पुणे बाजूकडे निघाला. टेम्पो पुणे शहर हद्दीत गेला तरीसुद्धा बिट मार्शलनी वाहनाचा पाठलाग सुरू ठेवून ग्रामीण कंट्रोल यांच्याशी संपर्क साधून पुणे शहर पोलीस दलाकडून मदत मिळणेबाबत कळवले. चालकाने टेम्पो हडपसरवरून मोहम्मदवाडीकडे वळवला. तरडेवस्ती येथे टेम्पो उभा करून चालक पळून गेला. त्यानंतर देवकर व शिंदे यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. टेम्पोची तपासणी केली असता त्यात प्लॅस्टिकच्या ३८ कॅनमध्ये १ हजार ३३० लिटर गावठी हातभट्टी सापडली.