Pune | आळंदी परिसरात धर्मांतरासाठी आर्थिक मदतीचे आमिष; चौदा जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 12:33 PM2023-01-16T12:33:58+5:302023-01-16T12:34:28+5:30
विशेष म्हणजे धर्मांतरबंदी कायद्यासाठी शनिवारी (दि.१५) आळंदीत विराट जनमोर्चा काढण्यात आला होता...
आळंदी (पुणे) : आळंदी व शहरालगतच्या गावांमध्ये सध्या धर्मांतरासाठी नागरिकांना जबरदस्ती केल्याचे समोर येत आहे. दहा दिवसांपूर्वी आळंदी परिसरात येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचं लाल सरबत पाजून धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असताना आता पुन्हा एकदा आर्थिक मदतीचे आमिष दाखवून धर्मांतर करत असल्याचा प्रकार रविवारी (दि.१६) मरकळ गावात घडला आहे. विशेष म्हणजे धर्मांतरबंदी कायद्यासाठी शनिवारी (दि.१५) आळंदीत विराट जनमोर्चा काढण्यात आला होता. त्याच्याच दुसऱ्या दिवशी लगतच्या गावांमध्ये धर्मांतरासाठी प्रयत्न केले जात असल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात प्रदीप मधुकर वाघमारे (चऱ्होली), प्रशांत मधुकर वाघमारे (वय ३०), रोनक शैलेश शिंदे (वय १८ रा.भोसरी), अशोक मुकेश पांढरे (वय १९ भोसरी), मुकेश जयकुमार विश्वकर्मा (वय २५ रा.भोसरी), लक्ष्मण श्रीरंग नायडू (वय ३५ रा.भोसरी), म्यूंगी व्युयुंग वुन (वय ३८ रा. भोसरी), ज्युईल वोमन युन (वय ३६), ईशा भाऊसाहेब साळवे (वय १९) या तीन महिला व एक अल्पवयीन मुलगी अशा एकूण चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रसाद भाऊसाहेब साळुंखे (वय २५ रा. मरकळ) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या गावातील लोकांच्या घरासमोर जाऊन तुम्ही बायबल वाचता का, चर्चमध्ये या, आम्ही तुम्हाला धंद्याला आर्थिक मदत करू असे आमिष दाखवून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान याबाबतचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.