विद्यापीठात एक तास उशिराने मिळाला एमए मराठीचा पेपर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 09:21 PM2018-05-11T21:21:48+5:302018-05-11T21:21:48+5:30

पेपरच्या अर्धा तास अगोदर प्रश्नपत्रिका पाठविणे आवश्यक असताना त्याला सव्वा तास उशीर झाला. 

MA paper got an hour late in the university | विद्यापीठात एक तास उशिराने मिळाला एमए मराठीचा पेपर 

विद्यापीठात एक तास उशिराने मिळाला एमए मराठीचा पेपर 

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थी त्रस्त : परीक्षा विभागाचा पुन्हा ढिसाळ कारभार महाविद्यालयांमध्ये एमएचे पेपर सध्या सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा ई-मेल हॅक करून प्रश्नपत्रिका फोडल्याचे प्रकरण ताजे असतानाच परीक्षा विभागाचा आणखी एक ढिसाळ कारभार उजेडात आला आहे. परीक्षा विभागाकडून संलग्नित महाविद्यालयांना सव्वा तास उशिराने एमए व्दितीय वर्ष मराठीच्या प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांवर सायंकाळी सव्वा सात वाजेपर्यंत परीक्षा देण्याची वेळ आली.  
महाविद्यालयांमध्ये एमएचे पेपर सध्या सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी ३ ते ६ या वेळेत एमए व्दितीय वर्षाचा मराठी विषयाचा ‘विशेष लेखकांचा अभ्यास' हा पेपर होता. परीक्षा विभागाकडून वेबमेल व्दारे प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर त्याच्या प्रिंटआऊट काढून पेपर घेतला जातो. मात्र, पेपरची ३ वाजण्याची वेळ उलटून गेली तरी परीक्षा विभागाकडून प्रश्नपत्रिका मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये एकच गोंधळ उडाला, त्यांनी परीक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रश्नपत्रिका पाठविण्याबाबत विचारणा सुरू केली. 
नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा विभागाने पेपरच्या अर्धा तास अगोदर संबंधित महाविद्यालयांना आॅनलाईनद्वारे प्रश्नपत्रिका पाठविले जाते. त्यानंतर त्याच्या प्रिंटआऊट काढून परीक्षा घेतली जाते. ‘विशेष लेखकांचा अभ्यास’ या विषयाची प्रश्नपत्रिका पाठविण्यापूर्वी त्यामध्ये काही चुका झाल्या असल्याचे लक्षात आले. या चुका दुरूस्त करून त्या महाविद्यालयांमध्ये पाठविण्यास विलंब होत गेला. 
प्रश्नपत्रिका मिळण्यास उशीर झाल्यामुळे दुपारी ३ चा पेपर सव्वा चार वाजता सुरू झाला. त्यानंतर ६ ऐवजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आली. पेपर उशिरा सुटल्याने उपनगरांमधून तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. 
ढिसाळ कारभारामुळे विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह
परीक्षांचे निर्दोष पध्दतीने आयोजन करणे, त्यांचे वेळेत निकाल लावणे ही विद्यापीठाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. विद्यापीठ अनुदान आयोग तसेच नॅकच्या निकषांनुसार मुल्यांकन पध्दतीला खूप महत्त्व देण्यात आले आहे. विद्यापीठांची परीक्षा व्यवस्था किती सक्षम आहे, त्यावर विद्यापीठाची विश्वासाहर्तेवर अवलंबून आहे. वेबमेल हॅक करून प्रश्नपत्रिका लिक होण्याबरोबरच प्रश्नपत्रिका पाठविण्यास विलंब होण्याचे प्रकार घडत असल्याने यामध्ये कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी हस्तक्षेप करून सुधारणा करण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

Web Title: MA paper got an hour late in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.