पुणे : सन २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यात मुसंडी मारणाऱ्या भाजपा-शिवसेना महायुतीपुढे या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जोरदार आव्हान उभे केले आहे. पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये २०१४ मध्ये भाजपाने १२, शिवसेनेने ३, 'राष्ट्रवादी'ने ३, काँग्रेसने १, मनसेने १ तर 'रासप'ने १ जागा जिंकली होती.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी (बारामती), भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा (कोथरुड), विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादी (आंबेगाव), माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपा (इंदापूर) हे राज्यस्तरीय नेते जिल्ह्यातून या वेळी नशीब आजमावत आहेत. गेल्या महिनाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, रामदास आठवले, आनंद शर्मा तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, निर्मला सीतारामन, रविशंकर प्रसाद आदी नेत्यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत भाग घेतला होता.
सन २०१४ मधील संख्याबळ टिकवून आणखी जागा जिंकण्यासाठी महायुतीकडून प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे. तर गेल्यावेळचे अपयश धुवून काढण्यासाठी काँग्रेस आघाडीनेही कोणतीही कसर सोडलेली नाही. या दोन प्रमुख विरोधकांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि 'एमआयएम'चे उमेदवार महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. दरम्यान शनिवारी सायंकाळी संपलेल्या प्रचारावर पावसाचे सावट होते. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही सोमवारी (दि. २१) पावसाचा अंदाज असल्याने मतदानावर त्याचा परिणाम होण्याची भीती राजकीय पक्षांना वाटू लागली आहे.