पुणे: आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मनसेची पहिली सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र पावसाने सायंकाळी पुन्हा हजेरी लावल्याने राज ठाकरेंची पहिली सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यभरातील मनसेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पुण्यातील राज ठाकरे यांची सभा सुरू होण्यापूर्वीच पावसाने तुफान हजेरी लावली. सकाळी पडलेल्या पावसाने मैदानावर चिखल झाल्याने तसेच पाणी साठल्याने कार्यकर्त्यांनी मैदान भुसा, खडी व मोठमोठे फ्लेक्स टाकून व्यवस्थित करून घेतले होते. परंतु, संध्याकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची दाणादाण उडाली होती. त्यानंतर अखेर पुण्यातील राज ठाकरेंची पहिली सभा रद्द करण्यात आली आहे.
कसबा मतदार संघाचे उमेदवार अजय शिंदे यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांची सभा सरस्वती मंदिर हायस्कुलच्या मैदानावर (नातू बाग) आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी सुरुवातीला शहरात कोणतीही शाळा मैदान द्यायला तयार नव्हती. याबाबत मनसेने पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन अलका टॉकीज चौकात सभा घेण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर सरस्वती मंदिर शाळेने मैदान देण्यात आले होते.