Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीत चुरसच राहिली नाही..: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 07:32 PM2019-10-15T19:32:03+5:302019-10-15T19:34:01+5:30
राज्यात महायुतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ..
सासवड : ‘‘विधानसभा निवडणुकीत काही चुरस राहिलेली नाही. राज्यात महायुतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सासवड येथे केले.
युतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारासाठी सासवड येथील पालखी मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, काँग्रेस -राष्ट्रवादीच्या १५ वर्षाच्या काळात जे काम झाले नाही, त्यापेक्षा युतीच्या पाच वर्षाच्या काळात जास्त विकास कामे झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रचारास येत नाहीत तर राष्ट्रवादी मध्ये कोणी राहण्यास तयार नाही. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फीच आहे. निकालानंतर काँग्रेसचे संख्याबळ निम्मे होईल. मागील पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे पुरंदर तालुक्यात ज्यांनी आणली त्या विजय शिवतारेंना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिफारशीने कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी देऊ. गुंजवणी प्रकल्पाच्या उभारणीपासून ते जलवाहिनीच्या अंतिम कामपर्यंत अनेक संकटांवर मात करत विजय शिवतारे यांनी हा प्रकल्प मार्गी लावला. प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणारच व त्याद्वारे शेती, रोजगार, रस्ते आदीमार्गे विकास मार्गी लागणार अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
विजय शिवतारे म्हणाले, सत्तेच्या ५ वर्षात पुरंदर - हवेलीतील अनेक कोटींची शेततळी, बंधारे, रस्ते, पाणी योजना, कचरा डेपो कपींग व बायोमायनिंग आदी विकासकामे मार्गी लागली. तालुक्यात यापुढे कोणत्याही स्वरूपाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.
यावेळी माजी आमदार संभाजी कुंजीर, जालिंदर कामठे, पंडित मोडक, दिलीप यादव, सचिन लंबाते, गिरीश जगताप, शंकर हरपळे, अजित जाधव, साकेत जगताप आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी आमदार प्रसाद लाड, बाबा जाधवराव, संगीता राजेनिंबाळकर, राहुल शेवाळे, रमेश जाधव, दत्ता काळे, विष्णू भोसले, पंढरीनाथ जाधव, मंदार गिरमे, अभिजित जगताप, सचिन भोंगळे, डॉ अस्मिता रणपिसे, डॉ राजेश दळवी यांसह पुरंदर - हवेलीतील शिवसेना, भाजपा, रिपाई महायुतीचे कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित होते. अतुल म्हस्के यांनी सूत्रसंचलन केले.