वसंत आबाजी डहाके, राजेंद्र बहाळकरांना महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 07:47 PM2019-12-17T19:47:37+5:302019-12-17T19:50:12+5:30
५० वर्षांचा इतिहास संकेतस्थळावर मिळणार
पुणे : अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेचे साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दिलीप वि. चित्रे स्मृति ‘साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ वसंत आबाजी डहाके (यवतमाळ) यांना, तर समाजकार्यामध्ये ‘विशेष कृतज्ञता पुरस्कार’ राजेंद्र बहाळकर (पुणे) यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या्रपसंगी मुकुंद टाकसाळे, डॉ. मनीषा गुप्ते, डॉ. रमेश अवस्थी, महाराष्ट्र फाऊंडेशनचे डॉ. सुरेश तलाठी, माधुरी देशमुख आदी उपस्थित होते. विनोद शिरसाठ म्हणाले, यंदा पुरस्कारांचे हे २६ वे वर्ष आहे. यावर्षीच्या समारंभाचे आयोजन महिला सर्वागीण उत्कर्ष मंडळ, साधना ट्रस्ट यांच्या विद्यमाने केले जाणार आहे. या वर्षी साहित्यातील चार आणि समाजकार्यातील चार असे एकूण आठ पुरस्कार दिले जाणार आहेत. साहित्य क्षेत्रात ‘रिंगाण’ या कादंबरीसाठी ललितग्रंथ पुरस्कार कृष्णात खोत (कोल्हापूर), ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकासाठी रा. शं. दातार नाट्य पुरस्कार दत्ता पाटील (नाशिक), ‘लीळा’ पुस्तकांच्या या गं्रथासाठी अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार नीतीन रिंढे (मुंबई) देण्यात येणार आहेत.
समाजकार्य पुरस्कारांमध्ये नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार ‘केरळ शास्त्र साहित्य परिषद कोझिकोड’ या संस्थेला तर ‘कार्यकर्ता संघर्ष पुरस्कार’ जमीलाबेगम पठाण इताकुला (मुंबई), ‘प्रबोधन’ पुरस्कार शहाजी गडहिरे (सोलापूर) यांना देण्यात येणार आहेत. १२ जानेवारी २०२० ला सायंकाळी ५ वाजता टिळक स्मारक मंदिर येथे पुरस्कार माहिती हक्क कार्यकर्त्या अरूणा रॉय यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र फाउंडेशनचे अध्यक्ष अंकुश कर्णिक, पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांच्यासह अमेरिकेतून आलेले सदस्य उपस्थित राहणार आहेत.
..................
५० वर्षांचा इतिहास संकेतस्थळावर मिळणार
तरूणाईला मागील ५० वर्षांच्या साहित्याची माहिती मिळावी, इतिहास कळावा यासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात काम सुरू असून लवकरच संकेतस्थळ सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मागील सर्व घडामोडी जाणून घेण्यास मदत होणार होईल, असे महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने माहिती देण्यात आली.