Maharashtra HSC Result 2018 : 2301 कॉलेजची शंभरी तर 48 कॉलेजला भोपळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:39 PM2018-05-30T13:39:55+5:302018-05-30T13:51:54+5:30
या निकालानुसार राज्यातील तब्बल ४८ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. तर २३०१ कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर केला झाला. परीक्षेचा निकाल ८८. ४१टक्के इतका लागला आहे. या निकालानुसार राज्यातील तब्बल ४८ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. तर २ हजार३०१ कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये २०१८मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यामध्ये कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार तर वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता. या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली असून ९२.३६टक्के मुली तर ८५.२३टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षी विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रम या शाखांच्या निकालानुसार विज्ञान शाखेतील १०, कला शाखेतील सर्वाधिक ३६, वाणिज्य शाखेतील ११ तर व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेतील एका कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागला आहे.शंभर टक्के निकाल लागणाऱ्या महाविद्यालयांची संख्याही मोठी असून विज्ञान शाखेत पुणे विभागातील ३०८, कला शाखेत औरंगबादमधील ५६, वाणिज्य शाखेत पुन्हा पुणे विभागातील १२७ तर व्यावसायिक अभ्यासक्रमात मुंबई विभागातील १५ महाविद्यालयांचा समावेश होतो. ९० आणि त्यापेक्षा अधिक टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५हजार ४८६ इतकी असून त्यात मुंबई विभागाने बाजी मारली आहे. मुंबईतील २हजार २८८ विद्यार्थी तर सर्वात कमी ५७ विद्यार्थ्यांनी ९०टक्क्यांची सीमा ओलांडली आहे.