पुणे- न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, न्यायदेवतेमुळे मी आज बाहेर येऊ शकलो आणि पुढे मी निर्दोष सिद्ध होऊन बाहेर पडेल. अनेकांनी मी बाहेर यावं म्हणून प्रयत्न केले, असं म्हणत छगन भुजबळांनी अनेक राजकीय नेत्यांचे आभार मानले. मी पक्षांतर करणार अशा चर्चा होत होत्या. त्यावर आज मी खुलेपणाने बोलणार, कारण हा राष्ट्रवादीचा मंच आहे. आज मी माझी भूमिका स्पष्ट करेन, असंही भुजबळ म्हणाले आहेत. महाराष्ट्र सदन सुंदर, छगन भुजबळ अंदर, अशा भावनाही भुजबळांनी व्यक्त केल्या. मी राष्ट्रवादी पक्ष सोडणार नाही, अशी भूमिकाही भुजबळांनी व्यक्त केली आहे.
मी जेलमध्ये असताना आठवड्यातून तीनदा माझ्या घरचे साहेबांच्या घरी जायचे. ठोकर लागल्यानंतर येते ती कामयाबी, बचेंगे तो और भी लढेंगे, हम बचेंगे भी और लढेंगे भी, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. सर्व पक्ष, जाती-धर्मांना सोबत घेऊन गेलं पाहिजे. 17 टक्के आरक्षण उरलंय आणि 400 जाती आहेत, कसं द्यायचं आरक्षण?, मराठा समाजाने समजून घ्यावं, तो मोठा भाऊ आहे, मराठा आरक्षणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, कुणीही सांगावं मी विरोध केला.
इंदिराजींची आणीबाणी घटनेवर आधारित होती, आताची आणीबाणी मात्र भीषण आहे. आपण आत्मसंतुष्ट नाही, चार वर्षात त्यांनी खूप दिलं. शेतकऱ्यावर कमी भावासाठी जबरदस्ती, शेतकरी रडताएत, पाकिस्तानकडून आयात केलेली साखर आता यांना गोड लागते. आत्महत्या आता गावात नव्हे, तर मंत्रालयासमोर होतात, केवढे चांगले दिवस आलेत. शेतकरी आत्महत्या करत नाही, हमीभाव मिळतोय, चार किमी गंगा दाखवा जी तुम्ही स्वच्छ केली, असंही भुजबळ म्हणाले. त्यांनी खूप कामे केली, असे ते सांगतीलसुद्धा, देशात चार स्मार्ट सिटी दाखवा, चार जिल्हे दाखवा जे पूर्ण प्रकाशमान आहेत, ज्यांच्यातील जनधन खाती जिवंत आहेत. स्टार्टअप इंडिया, मेकअप इंडियानंतर रुईनअप इंडिया येतंय असं वाटत आहे. गेल्या चार वर्षात देशात एकही अत्याचार झाला नाही, सर्वत्र शांतता आहे. नोटाबंदीमुळे दहशतवाद संपला असून, सर्वांना नोकरी, घराघरात स्वस्त गॅस दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार, असं म्हणत भुजबळांनी भाजपा सरकारवर उपरोधिक टीका केली आहे. घोड्याला भाव आला, गाड्या सोडून लोकं घोडे घ्यायला लागले, पेट्रोल परवडत नाही, बाहेर आल्यानंतर खायचं काय? पाहिलं तर सर्व कुटुंबाच्या खात्यात 15-15 लाख जमा, असं म्हणत भुजबळांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. मै जिंदगी का साथ निभाता चला गया, ...बरबादीयोंका जश्न मनाता चला गया, जो हो गया उसे भुलाता चला गया, या शायरीतून भुजबळांनी मोदी सरकारचे वाभाडे काढले आहेत.
म्हणे 100 कोटी रुपयांचा माझा बंगला आहे, सगळं अटॅच केलं, मात्र लोकांचं प्रेम अटॅच नाही करू शकले, म्हैस होती पाच फुटांची गाभण आणि रेडकू निघालं 15 फुटांचं, अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटदाराची नेमणूक मी केली नाही, त्यावेळी मंत्रीही नव्हतो. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचा कंत्राटदारही छगन भुजबळने नेमला नाही. वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही. जिथे- जिथे छगन भुजबळ नाव तिथे धाडी टाकल्या. कुणी वाघ म्हणतंय, कुणी माकड म्हणतंय, बंदर उछला तो छोडेगा नही, असं म्हणत भुजबळांनी विरोधकांना इशारा दिला आहे. हा राष्ट्रवादीचा मंच आहे. त्यामुळे मी मनापासून बोलणार आहे. माझ्यासाठी सर्व पक्षांचे नेते पाठीशी राहिले, सर्वांचेच आभार मानतो, असंही भुजबळ म्हणाले. माझ्या सुटकेसाठी मोर्चे काढण्यात आले, पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे भुजबळांनी मनापासून आभार मानले आहेत.