महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून तीन नावे निश्चित, उद्या पाठविणार महामंडळाकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 09:53 PM2017-10-11T21:53:53+5:302017-10-11T21:54:09+5:30
बडोदा येथे होणार असलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेला सात अर्ज प्राप्त झाले आहेत.
पुणे : बडोदा येथे होणार असलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेला सात अर्ज प्राप्त झाले आहेत. साहित्यिक राजन खान, माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, अनुवादक रवींद्र गुर्जर यांचे अर्ज अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे पाठविण्याचे निश्चित केल्याचे समजते.
मसापमध्ये संमेलनाध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अर्ज करण्यासाठी बुधवार हा शेवटचा दिवस होता. या कालावधीत सात लेखकांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी कोणत्या तीन नावांवर शिक्कामोर्तब करायचे, याबाबत परिषदेसमोर पेच निर्माण झाला होता. रवींद्र शोभणे, किशोर सानप, विश्वास वसेकर, श्रीनिवास वारूंजीकर यांचे अर्ज वगळत खान, देशमुख, गुर्जर यांची नावे पाठविण्याचा निर्णय परिषदेच्या पदाधिका-यांनी एकमताने घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. उद्या (गुरुवारी) ही नावे साहित्य महामंडळाकडे पाठवण्यात येणार आहेत