पुणे : प्रशासन भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या मागण्यांकडे पूर्वीपासून दुर्लक्ष करत आले आहे. प्रशासनासमोर कितीही गुडघे टेकले तरी समस्या सुटत नाहीत. आमच्या पक्षाचा एखादा प्रतिनिधी जरी सत्तेत असेल तर भटक्या विमुक्त जमातीकडे लक्ष केंद्रित केले जाईल. या हेतूने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होणार आहे. भटक्या विमुक्त संघटनेचे आणि महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी शारदा माने उपस्थित होत्या.माने म्हणाले, आमच्या भटक्या विमुक्त जमातीतील लोक दर तीन दिवसाला घर बदलतात. भारतीय राज्यघटनेने आम्हाला जन्मत: च नागरिकत्व दिले होते. शिक्षणाचे प्रमाण एक टक्काही नाही, अशा परिस्थितीत केंद्र सरकारने एन. आर. सी, सी. ए. ए आणि एन. पी. आर हे कायदे आणले. त्यामुळे आमचे नागरिकत्व नष्ट होणार आहे. भटक्या विमुक्तांना अनुसूचित जमातीत घाला ही मागणी मान्य होत नाही. कारण आमची संख्या नगण्य आहे. लोकशाहीमध्ये डोकी महत्वाची आहेत. शिक्षण नसल्याने बुद्धिबळ नाही. तर दारिद्रयामुळे द्रव्यबळ नाही. सत्तेशिवाय प्रश्न सुटत नाहीत. आम्ही विधानसभेत राष्ट्रवादी पक्षाला मदत केली. आता राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार माझे चांगले मित्र आहेत. भटक्या विमुक्तांना रेशनिंग कार्ड नाही, मतदार यादीत नाव नाही, घरे नाहीत तसेच शिक्षणापासून वंचित अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. ते आमच्या समस्या नक्कीच सोडवतील.१२ मार्चला कराडपासून शोधयात्रा सुरू करणारराष्ट्रवादी पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेऊन भटक्या विमुक्त वंचितांच्या नागरिकत्वाची शोधयात्रा १२ मार्चला कराडपासून सुरू करणार आहोत. तर १२ एप्रिलला बारामती येथे यात्रेचा समारोप होईल. त्याचदिवशी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होईल, असेही माने यांनी सांगितले.
महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 8:37 PM