भीमाशंकर महाशिवरात्र यात्रा उत्साहात साजरी; एक लाख भाविकांनी घेतले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 07:13 PM2018-02-13T19:13:22+5:302018-02-13T19:19:53+5:30

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रनिमित्त सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. शनिवार, रविवार या सुट्यांनंतर मंगळवारी महाशिवरात्र आल्याने व जवळ आलेल्या परीक्षांमुळे यावर्षी महाशिवरात्र यात्रेस भाविकांची संख्या कमी होती.

Mahashivaratra Yatra in Bhimashankar; One lakh devotees took part in the exhibition | भीमाशंकर महाशिवरात्र यात्रा उत्साहात साजरी; एक लाख भाविकांनी घेतले दर्शन

भीमाशंकर महाशिवरात्र यात्रा उत्साहात साजरी; एक लाख भाविकांनी घेतले दर्शन

Next
ठळक मुद्देपहाटेच्या दर्शनास मध्यरात्री बारा वाजल्यापासून सकाळी सातवाजेपर्यंत भाविकांच्या रांगापोलिसांनी ठेवला होता चोख बंदोबस्त, १७० पोलीस कर्मचारी, २८ अधिकारी तैनात

भीमाशंकर : ‘हर हर महादेव... जंगलवस्ती भीमाशंकरमहाराज की जय..!’ च्या जयघोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रनिमित्त सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. शनिवार, रविवार या सुट्यांनंतर मंगळवारी महाशिवरात्र आल्याने व जवळ आलेल्या परीक्षांमुळे यावर्षी महाशिवरात्र यात्रेस भाविकांची संख्या कमी होती. पवित्र मानल्या जाणाऱ्या पहाटेच्या दर्शनास मध्यरात्री बारा वाजल्यापासून सकाळी सातवाजेपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. 
महाशिवरात्रीच्या रात्री १२ वाजता देवस्थानचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव, माजी वनमंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा परिषदचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके यांनी सपत्नीक शासकीय पूजा केली. देवस्थानचे विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडिलकर, संतोष कोडिलकर, पुरुषोत्तम गवांदे गुरूजी, आशिष कोडिलकर, प्रसाद गवांदे, मयूरेश कोडिलकर यांच्या वेदपठनात ही पूजा पार पडली.  
महाशिवरात्रीच्या पहाटे शिवलिंगाचे दर्शन घेणे पवित्र मानले जात असल्याने अनेक भाविक रात्री मुक्कामी आले होते. सकाळच्या दर्शनासाठी सात वाजेपर्यंत रांग लागली होती. यावर्षी यात्रेत आबालवृद्धांपेक्षा तरुणवर्ग मोठ्या संख्येने दिसत होता. मुंबईच्या उपनगरांमधून पायी कोकण घाट चढून भीमाशंकरमध्ये मोठ्या संख्येने तरुण आलेले दिसत होते. तसेच अनेक ठिकाणांहून आलेल्या दिंड्यांची गर्दी पाहावयास मिळाली.  
पहाटे जेवढी गर्दी झाली तेवढी गर्दी दिवसभर  दिसली नाही. सकाळी १० नंतर गर्दी वाढेल, असे वाटत होते, मात्र दर्शनरांग अर्धा किलोमीटरच्या पुढेसुद्धा गेली नाही. दर वर्षी बसस्थानकापर्यंत जाणारी रांग यावर्षी मात्र पायऱ्यांच्या वर आली नाही. एकंदरीत महाशिवरात्र यात्रेस मध्यम स्वरूपाची गर्दी दिसली.   


यात्रेनिमित्त बसस्थानक ते मंदिर या मार्गावर प्रसाद, बेलफुल, खाद्यपदार्थ यांची दुकाने लागली होती. भाविकांची संख्या कमी राहिल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याचे दुकानदार सांगत होते. तसेच, कोकणकड्याजवळील पटांगणात यात्रेचा बाजार भरला होता, येथेही गर्दी कमी दिसली. 
पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रशिक्षित पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षीका तेजस्विनी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, खेडचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, घोडेगावचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली १७० पोलीस कर्मचारी, २८ अधिकारी तैनात करण्यात आले होते. देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त सुनील जोशी, देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. सुरेश कौदरे, आंबेगावचे तहसीलदार रवींद्र सबनीस हे देवस्थानच्या कार्यालयात व मंदिरात थांबून यात्रेचे नियोजन करत होते. 
एसटी महामंडळाने यात्रेनिमित्त वाहनतळ ते बस स्थानक अशा वाहतुकीसाठी ४०  मिनीबस ठेवल्या होत्या. तसेच पुणे, खेड, मंचर, नारायणगाव येथून जादा गाड्या ठेवल्या होत्या.  आरोग्य खात्याने वैद्यकीय पथक ठेवले होते. तसेच यात्रेपूर्वी भीमाशंकरमधील हॉटेलांमधून पाण्याची व अन्नाची तपासणी केली होती. प्रत्येक हॉटेलमध्ये व घरात टिसीएलच्या बाटल्या दिल्या आहेत.


मंचर येथील बाबा अमरनाथ सेवा संघाने मोफत फराळ वाटप ठेवले होते. तसेच मंचर ते भीमाशंकर रस्त्यावर गंगापूर फाट्यावर विनायक गोविंद लोहोट यांनी  खिचडी व केळांचे वाटप केले. या भंडाºयाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

Web Title: Mahashivaratra Yatra in Bhimashankar; One lakh devotees took part in the exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.