भीमाशंकर : ‘हर हर महादेव... जंगलवस्ती भीमाशंकरमहाराज की जय..!’ च्या जयघोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रनिमित्त सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. शनिवार, रविवार या सुट्यांनंतर मंगळवारी महाशिवरात्र आल्याने व जवळ आलेल्या परीक्षांमुळे यावर्षी महाशिवरात्र यात्रेस भाविकांची संख्या कमी होती. पवित्र मानल्या जाणाऱ्या पहाटेच्या दर्शनास मध्यरात्री बारा वाजल्यापासून सकाळी सातवाजेपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. महाशिवरात्रीच्या रात्री १२ वाजता देवस्थानचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव, माजी वनमंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा परिषदचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके यांनी सपत्नीक शासकीय पूजा केली. देवस्थानचे विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडिलकर, संतोष कोडिलकर, पुरुषोत्तम गवांदे गुरूजी, आशिष कोडिलकर, प्रसाद गवांदे, मयूरेश कोडिलकर यांच्या वेदपठनात ही पूजा पार पडली. महाशिवरात्रीच्या पहाटे शिवलिंगाचे दर्शन घेणे पवित्र मानले जात असल्याने अनेक भाविक रात्री मुक्कामी आले होते. सकाळच्या दर्शनासाठी सात वाजेपर्यंत रांग लागली होती. यावर्षी यात्रेत आबालवृद्धांपेक्षा तरुणवर्ग मोठ्या संख्येने दिसत होता. मुंबईच्या उपनगरांमधून पायी कोकण घाट चढून भीमाशंकरमध्ये मोठ्या संख्येने तरुण आलेले दिसत होते. तसेच अनेक ठिकाणांहून आलेल्या दिंड्यांची गर्दी पाहावयास मिळाली. पहाटे जेवढी गर्दी झाली तेवढी गर्दी दिवसभर दिसली नाही. सकाळी १० नंतर गर्दी वाढेल, असे वाटत होते, मात्र दर्शनरांग अर्धा किलोमीटरच्या पुढेसुद्धा गेली नाही. दर वर्षी बसस्थानकापर्यंत जाणारी रांग यावर्षी मात्र पायऱ्यांच्या वर आली नाही. एकंदरीत महाशिवरात्र यात्रेस मध्यम स्वरूपाची गर्दी दिसली.
भीमाशंकर महाशिवरात्र यात्रा उत्साहात साजरी; एक लाख भाविकांनी घेतले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 7:13 PM
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रनिमित्त सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. शनिवार, रविवार या सुट्यांनंतर मंगळवारी महाशिवरात्र आल्याने व जवळ आलेल्या परीक्षांमुळे यावर्षी महाशिवरात्र यात्रेस भाविकांची संख्या कमी होती.
ठळक मुद्देपहाटेच्या दर्शनास मध्यरात्री बारा वाजल्यापासून सकाळी सातवाजेपर्यंत भाविकांच्या रांगापोलिसांनी ठेवला होता चोख बंदोबस्त, १७० पोलीस कर्मचारी, २८ अधिकारी तैनात