वडगाव मावळ : राज्यात महाविकास आघाडी स्थापन होणार असल्याची चर्चा आहे. त्याचे पडसाद तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव मावळ नगरपंचायतीत विविध विषयक समितीच्या निवडणुकीत उमटले. सर्व सहा समितीच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसेची अध्यक्षपदी वर्णी लागली. भाजपाला एकही सभापतिपद मिळाले नाही. भाजपाचे दोन उमेदवार पराभूत झाले. विधानसभा निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेल्या वडगाव नगरपंचायतीच्या विषय समित्यांची निवडणूक गुरुवारी झाली. गेल्यावर्षी समित्यांची निवडणूक झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने भाजपाला मदत केल्याने भाजपाला तीन समितीचे सभापतिपद मिळाले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके विजयी झाले. शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन्ही गटाला एकत्र केल्याने या वेळी भाजपाला एकही सभापतिपद मिळाले नाही.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार मधुसूदन बर्गे, सहायक निवडून निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली. स्वच्छता व आरोग्य समितीची निवडणूक झाली़ राष्ट्रवादी काँग्रेस राजेंद्र कुडे यांना ३ मते तर भाजपाचे दिनेश ढोरे यांना २ मते मिळाली़ कुडे विजयी झाले. नियोजन समितीची निवडणूक झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रजीत वाघमारे यांना ३ तर भाजपचे किरण म्हाळसकर यांना २ मते मिळाली़ या दोन्ही समितीच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार पराभूत झाले. नगरसेवक सुनील ढोरे, राजेश बाफना, विशाल वहिले, प्रवीण ढोरे, सुनील शिंदे, शरद ढोरे, अमर चव्हाण आनंदोत्सव साजरा करण्यात आला.राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा सुरू आहे. परंतु, त्या आधीच वडगावमध्ये महाविकास आघाडीने वर्चस्व सिद्ध केले आहे........* सार्वजनिक बांधकाम खाते सभापती : पूनम जाधव, सदस्य दिनेश ढोरे, दिलीप म्हाळसकर, माया चव्हाण, प्रमिला बाफना़ * शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य सभापती : सायली म्हाळसकर (मनसे), सदस्य अर्चना म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रमिला बाफना, पूजा वहिले. * पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती : राहुल ढोरे, सदस्य अर्चना म्हाळसकर, दिनेश ढोरे, माया चव्हाण, पूजा वहिले. * नियोजन व विकास समिती सभापती : चंदजीत वाघमारे, सदस्य किरण म्हाळसकर, दिनेश ढोरे, माया चव्हाण, पूजा वहिले. * स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती : राजेंद्र कुडे, सदस्य दशरथ केंगले, अर्चना म्हाळसकर, प्रमिला बाफना, माया चव्हाण. * महिला बालकल्याण सभापती : शारदा ढोरे, सदस्य दीपाली मोरे, सुनीता भिलारे, प्रमिला बाफना, माया चव्हाण.
राज्याआधीच वडगाव मावळ नगरपरिषदेत ''महाविकास आघाडी ''
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 8:16 PM
राज्यात महाविकास आघाडी स्थापन होणार असल्याची चर्चा आहे.
ठळक मुद्देसहा समितीच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसेची वर्णी