‘मायलेकरा’च्या अमूर्त नात्याला मिळाले शब्दरुपी कोंदण!; पुणेकरांनी अनुभवला उत्कट भावानुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:53 PM2018-01-06T12:53:19+5:302018-01-06T12:58:09+5:30
रा. चिं. ढेरे स्नेहपरिवारातर्फे आई आणि मुलं यांच्या आंतरसंबंधांचा वेध घेणारा ‘मायलेकरं’ हा उत्कट भावानुभव शुक्रवारी रसिकांनी अनुभवला. अभिवाचनातून माय-लेकरांचे नाते अलवार उलगडत गेले.
पुणे : सृष्टीच्या चराचरातील निर्मितीचा प्रत्यय देणारं नातं म्हणजे ‘मायलेकरं’! उत्कटता, आर्तता, व्याकुळता अशा भावनांचा अनोखा मिलाफ...अमूर्त नात्याला शब्दरुपाने मिळालेले मूर्त कोंदण... कविता, कथांमधून पाझरलेला वात्सल्याचा झरा... असा उत्कट भावानुभव उपस्थितांनी गुरुवारी अनुभवला. अभिवाचनातून माय-लेकरांचे नाते अलवार उलगडत गेले आणि ‘काळ बदलला तरी काळीज बदलत नाही’, याचे प्रत्यंतर ‘मायलेकरं’ मधून येत गेले.
रा. चिं. ढेरे स्नेहपरिवारातर्फे आई आणि मुलं यांच्या आंतरसंबंधांचा वेध घेणारा ‘मायलेकरं’ हा उत्कट भावानुभव शुक्रवारी रसिकांनी अनुभवला. या कार्यक्रमाचे निवेदन, निवड आणि गुंफण डॉ. अरुणा ढेरे यांची होती. ढेरे यांच्यासह वीणा देव, गिरीश ओक आणि आशुतोष जावडेकर यांनी अभिवाचन केले. अनुराधा मराठे यांचे सुरेल गीतात्म सादरीकरणाने कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू गाठला.
‘निज रे निज छंद ताला रे, नंदलाला रे’ ही अंगाई, आचार्य अत्रे यांचे ‘दिनूचे बिल’ ही कथा, शांता शेळके यांची ‘आई म्हणजे तव्यावरची गरम पोळी’, ‘सकाळी कमी जेवलो तर आईला कसे कळते’ अशा कवितांमधून आईशी बाळाची जुळलेली नाळ कशा प्रकारे अधिकाधिक घट्ट होत जाते, याची अनुभूती आली. ‘जोपर्यंत आईच्या मुठीत आपलं बोट असतं, तोवर बालपण शाबूत असतं. मात्र, बोट सुटल्यावर आधाराची खरी जाणीव होते’, अशा रसपूर्ण निवेदनातून डॉ. अरुणा ढेरे यांनी नात्याचे विविध पदर उलगडून दाखवले.
संजीवनी मराठे यांच्या ‘बरं का गं आई’ या कवितेतून आईची आई होण्याचा चिमुरडीचा प्रवास, फ्रँक कॉकनर यांच्या कथेतून आईला इतर कोणाशीही शेअर न करण्याचा चिमुकल्याचा बालहट्ट, गौरी देशपांडे यांच्या ‘मिमी आणि आई’ या कथेतून आई आणि लेकीमधला लटका राग आणि त्यामागील काळजी अशा भावनांच्या हिंदोळयांवर उपस्थितांनी सैर केली.
इंदिरा संत यांच्या ‘घरातला मोठा मुलगा’ या कवितेतून मुलांचे वाढते वय, आई आणि मुलांमधील तुटत चाललेला संवादाचा पूल, पद्मा गोळे यांच्या ‘आईपणाची भीती’ या कवितेतून आईला वाटणारी आधुनिक जगाची भीती, अगतिकता, शोभा डे यांनी मुलांना लिहिलेले पत्र, नीलिमा माणगावे यांच्या कवितेतून अनुभवायला मिळालेलं अदभूत वळणावर येऊन ठेपणारं मायलेकीचं नातं, बहिणाबाई चौधरी यांची ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ तर अरुणा ढेरे यांची ‘पोर जन्मा आली तेव्हा, बाप म्हणाला कचरा, मीच म्हणाले असू द्या माझ्या जीवाला आसरा’ अशा एकाहून एक सरस कवितांनी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला.