देखभालीसाठी नेमलेल्या नोकराने लांबविले आॅनलाईन १८ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 07:53 PM2018-06-27T19:53:39+5:302018-06-27T19:55:07+5:30
नोकराने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या बँक खात्याच्या डेबीट कार्ड क्रमांक व पिन क्रमांकाचा वापर करुन इंटरनेट बँकींगच्या सहाय्याने वेळोवेळी रक्कम अन्य वेगवेगळ्या १० खात्यांवर वळविली आहे़.
पुणे : हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाच देखभाल करण्यासाठी नेमलेल्या नोकरानेच सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या बँक खात्यातून तब्बल १८ लाख १६ हजार ८२० रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. याप्रकरणी सायबर क्राईम सेलने दिनेश गोविंद साळवी (वय २८, रा़ साईस्मृती सोसायटी, बोरीवली पश्चिम, मुंबई) या नोकराला अटक केली आहे़.
सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सोपान चौधरी (रा़ मगरपट्टा, हडपसर) यांच्या ऍक्सिस बँकेच्या खात्यातून आॅनलाईन पद्धतीने १८ लाख १६ हजार रुपये काढून घेतली गेली़. सोपान चौधरी यांचे दादरच्या एॅक्सीस बँक शाखेत सॅलरी खाते आहे़. त्यात सप्टेंबर २०१७ मध्ये भविष्य निर्वाह निधीचे २३ लाख रुपये जमा झाले होते़. ते त्यापूर्वीपासून प्रदीर्घ कालावधीकरीता आजारी असल्याने मुंबई व पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते़. तब्येत बरी झाल्यावर त्यांनी बँक खाते तपासल्यावर इंटरनेट बँकेद्वारे त्यांच्या खात्यातून २९ सप्टेंबर २०१७ ते ११ जून २०१८ या दरम्यान १८ लाख १६ हजार रुपये काढून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले़. त्यांनी तात्काळ सायबर सेलशी संपर्क साधला़. त्यांच्या बँकेच्या माहितीचे व त्यास लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाचे विश्लेषण केले़. त्यात चौधरी उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये देखभाल करण्यासाठी नेमलेल्या ड्रायव्हर/नोकराने त्यांच्या बँक खात्याच्या डेबीट कार्ड क्रमांक व पिन क्रमांकाचा वापर करुन इंटरनेट बँकींगच्या सहाय्याने वेळोवेळी रक्कम अन्य वेगवेगळ्या १० खात्यांवर वळविली आहे़. सायबर क्राईम सेलच्या पथकाने मुंबईहून दिनेश साळवी याला ताब्यात घेतले़. तपासात त्याने आपण मित्रांच्या १० बँक खात्यांमध्ये आॅनलाईन ट्रान्सफर केल्याची कबुली दिली आहे़. आरोपीला हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़.
पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन गवते, उपनिरीक्षक रुपाली पवार, पोलीस शिपाई नवनाथ जाधव, शितल वानखेडे यांनी ही कामगिरी केली़.