दौंड रायझिंग अर्धमॅरेथॉन स्पर्धेत मलवाडकर प्रथम
By admin | Published: December 22, 2016 11:59 PM2016-12-22T23:59:01+5:302016-12-22T23:59:01+5:30
दौंड शहरात रोटरी क्लबच्या पुढाकाराने आयोजित दौंड रायझिंग या अर्धमॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूर येथील चंद्रकांत मलवाडकर यांनी ७
दौंड : दौंड शहरात रोटरी क्लबच्या पुढाकाराने आयोजित दौंड रायझिंग या अर्धमॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूर येथील चंद्रकांत मलवाडकर यांनी ७ किलोमीटरचे अंतर २२ मिनिटे २० सेकंदांत स्पर्धा पूर्ण करीत पहिल्या क्रमांकासह अकरा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत एकूण ९९०० स्पर्धक धावले व त्यामध्ये दौंड शहर व तालुक्यासह मुंबई, पुणे, ठाणे, नगर, कोल्हापूर, सातारा आदी ठिकाणचे स्पर्धक सहभागी झाले होते.
अर्ध मॅरेथॉन स्पर्धेतील विविध गटांतील विजेत्यांना एकूण ९७ हजार रुपयांची बक्षिसाची रक्कम धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आली.
दौंड शहरातील राज्य राखीव पोलीस दलाच्या मंगलमूर्ती कार्यालयाजवळ अर्धमॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी झेंडा दाखवून केला. राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक पाचचे समादेशक संजय शिंत्रे, समादेशक अजित बोऱ्हाडे, तहसीलदार विवेक साळुंखे, रेव्हरंड डेनिस जोसेफ, महेश भागवत, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रफुल्ल भंडारी, डॉ. राजेश दाते, विनायक काळे यांच्यासह भीमाजी भागवत, संदीप शितोळे आदी या वेळी उपस्थित होते.
रोटरी क्लब आॅफ दौंड, माळवाडी (ता. दौंड) येथील भाऊसाहेब भागवत विद्यालय आणि रोटरी क्लब आॅफ कुरकुंभ एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
राज्य राखीव पोलीस गट क्रमांक पाच ते बोरावकेनगरमार्गे मंगेश मेमोरियल शाळा ते लिंगाळी चौकपासून पुन्हा गट पाच, असा एकूण सात किलोमीटर अंतराचा अर्ध मॅरेथॉन मार्ग होता.
ज्येष्ठ नागरिक गटात अनवाणी धावलेल्या शांता लखू चव्हाण (कुरकुंभ) यांना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. त्याशिवाय स्पर्धक राजेश गोसावी, डॉ. भावना धुमाळ व दीपाली गोसावी यांचादेखील पुरस्काराने गौरव करण्यात आला. समादेशक संजय शिंत्रे, तहसीलदार विवेक साळुंखे आदींच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. जे. एन. आवारी यांनी संयोजन व समन्वयाची जबाबदारी पार पाडली.