Pune: मित्राचा खून करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या, मध्य प्रदेश येथून घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 11:41 AM2024-04-05T11:41:22+5:302024-04-05T11:45:01+5:30
चाकण ( पुणे ) : मोबाइल फोडला म्हणून तरुणाने एकाच खोलीत राहणाऱ्या सहकारी मित्राचा गळा आवळून आणि लोखंडी तव्याने ...
चाकण (पुणे) : मोबाइल फोडला म्हणून तरुणाने एकाच खोलीत राहणाऱ्या सहकारी मित्राचा गळा आवळून आणि लोखंडी तव्याने मारून खून केला होता. ही घटना गुरुवारी (२८ मार्च, २०२४) रात्री दहा वाजताच्या सुमारास महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथे घडली होती. खून केल्यानंतर आरोपी पळून गेला होता. त्याला गुन्हे शाखा युनिट तीनने मध्य प्रदेशमधील दमोह जिल्ह्यातून ताब्यात घेऊन अटक केली आहे.
रामसिंग सुलतानसिंग गोंड (वय ३०, रा. रेयाना, ता.जि. दमोह, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कालू मंगल रकेवार (वय २३, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड, मूळ रा. पथरीया, ता. जि. दमोह, मध्य प्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कालू याचा भाऊ पप्पू मंगल रकेवार यांनी महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पप्पू, कालू आणि रामसिंग हे तिघे एकाच कंपनीत ठेकेदारीवर काम करत होते. तिघेही एकाच खोलीत राहत होते. मंगळवारी (२६ मार्च) मोबाइल फोडल्याच्या कारणावरून कालू आणि रामसिंग यांच्यात वाद झाला. त्यावेळी कालू हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. रामसिंग हा कालू याच्या छातीवर बसून त्याला लोखंडी तव्याने मारहाण करत होता. तसेच कालू याच्या गळ्याभोवती कपड्याने आवळून मारण्याचा प्रयत्न करत होता. खून केल्यानंतर रामसिंग पळून गेला होता.
गुन्हे शाखेने आरोपी रामसिंग याला अटक करण्यासाठी दोन पथके तयार केली होती. रामसिंग याने मोबाइल फोन बंद केल्याने त्याचे तांत्रिक विश्लेषण देखील करता येत नव्हते. रामसिंग हा त्याच्या मूळ गावी गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट तीनचे एक पथक मध्य प्रदेशमधील दमोह जिल्ह्यात रियाना गावात पोहोचले. त्यावेळी रामसिंग हा पोलिसांची चाहूल लागल्याने तिथूनही पळून जात होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेत जेरबंद केले.