स्वप्नमहालात हलत्या झोपाळ्यावर विराजमान होणार मंडईचे 'शारदा गजानन'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 08:30 PM2022-08-25T20:30:31+5:302022-08-25T20:30:58+5:30
अखिल मंडई मंडळाचा १२९ वा गणेशोत्सव यंदा उत्साहात साजरा करण्यात येणार
पुणे : अखिल मंडई मंडळाचा १२९ वा गणेशोत्सव यंदा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रंगबेरंगी आरसे आणि झुंबराने सजलेल्या भव्य स्वप्नमहालात हलत्या झोपाळ्यावर शारदा गजानन विराजमान होणार आहेत. गणेश चतुर्थीला बुधवार, दिनांक ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. मंगळवार पेठेतील श्री स्वामी समर्थ मठाचे प्रमुख प्रतापकाका अनंत गोगावले आणि त्यांच्या पत्नी अपर्णा गोगावले यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होईल, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या १० दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजल्यापासून प्रात:पूजा, आरती, गणेशयाग,सायंपूजा आणि संध्याकाळी ७.३० वाजता महाआरती होणार आहे.
अण्णा थोरात म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातून शारदा गजाननाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त येतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मंडळाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी मंदिर परिसरात ३० सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून बाऊन्सर आणि २०० सुरक्षा स्वयंसेवक काम करणार आहेत.
गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एक वही आणि पेन देण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. वह्या आणि पेन जमा करुन पुणे आणि पुण्याबाहेरील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा बंधुभाव पुरस्कार वितरण सोहळा उत्सवकाळात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
असा असेल शारदा गजाननाचा भव्य स्वप्नमहाल
महिरपामध्ये सजलेले दिवे, मोराची भव्य कमान, रंगबेरंगी आरशांनी चकाकणारी सजावट आणि २० भव्य झुंबरांने बाप्पांचा स्वप्न महालात सजणार आहे. या महालात काल्पनिक वृक्षाला हलता झोपाळा लावण्यात येणार असून त्यावर शारदा गजानन विराजमान होणार आहेत. ३२ बाय १६ फूट असा भव्य झापोळा असणार आहे. स्वप्न महालात खांब वगळून विविध कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. विशाल ताजणेकर यांनी स्वप्न महालाचे कला दिग्दर्शन केले आहे.