पुणे : प्रिसिजन ऑटोमेशन अँड रोबोटिक्स इंडिया (पीएआरआय) कंपनीचे सह-संस्थापक मंगेश काळे यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्द्ल उद्योग जगतातील दिग्गजांसह मराठा चेंबर ऑफ कॉमर्सकडून त्यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे.
काळे हे स्वत: अभियंता होते. त्यांनी १९९० साली रणजीत दाते यांच्यासोबत पारी रोबोटीक्स कंपनी स्थापन केली होती.
पुण्यातील मराठी माध्यमात शिकलेल्या काळे यांनी अमेरिकेत जाऊन शिक्षण घेतलं. स्वत:चा व्यवसाय करायचा हे त्यांनी ठरवलेलं होतं. ऑटोमेशन, रोबोटीक्स आणि डिझायनींग या क्षेत्रात जागतिक स्तरावर नावाजलेली जपाननंतर आशियातील एकमेव कंपनी असलेल्या पारी कंपनीची त्यांनी १९९२ मध्ये सुरुवात केली. पहिली तीन वर्षं फक्त संशोधनावर भर दिला. इंम्पोर्ट ड्युटी २०० टक्के असल्यानं त्यांनी सगळं तंत्रज्ञान विकसित केलं. आजमितीस कंपनीची ७० टक्के निर्यात अमेरिका, युरोप, दक्षिण अफ्रिकेत होते. ‘फेरारी’च्या इंजिन लाईनपासून ‘जीप’च्या कंपास गाडीपर्यंत पारीचे ऑटोमेशन आणि रोबो काम करतात. कायम अभ्यास, सतत संशोधन, वाचन आणि नाविन्यावर भर त्यांनी भर दिला.
इंडियन डिफेन्स सर्विसेससाठीसुद्धा त्यांनी काम केले. बोफोर्सचे तोफगोळे तयार करणारी यंत्रणा, ‘तेजस’ लढाऊ विमानाचे विंडशिट आणि कोटींगचं तंत्रज्ञान कंपनीने तयार केले. जपान वगळता आशियातली कोणतीच कंपनी पारीसारखी उत्पादने तयार करत नाहीत. त्यांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) कार्यकारी समितीचे सदस्य म्हणूनही अनेक वर्ष काम केले आहे. एमसीसीआयएच्या ‘आयटी फॉर मॅन्युफॅक्चरींग’ या उपक्रमासाठी चीन आणि जर्मनीमध्ये गेलेल्या प्रतिनिधींमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांनी ऑटोमेशन समितीचे अध्यक्षपदही सांभाळले होते. काळे हे भारतातील तसेच विदेशातील अनेक नव उद्योजकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले होते.
====
मंगेश काळे यांच्या निधनामुळे धक्का बसला आहे. ते अनेक वर्ष एमसीसीआयएच्या कार्यकारी समितीचे सदस्य होते. तसेच संस्थेच्या ऑटोमेशन कमिटीचे अध्यक्षही होते. भारतातील ऑटोमेशन क्षेत्रातील मोठे नाव होते. ऑटोमेशन क्षेत्राविषयी ते प्रभावी वक्ते होते. ते नव उद्योजकांसाठी मोठे प्रेरणास्त्रोत होते.
- मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रीकल्चरचे ट्विट
====
मंगेश काळे यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे. आजही त्यांच्यासोबत १९९१ साली झालेली पहिली भेट विसरु शकणार नाही. प्रचंड ऊर्जा, बुद्धिमत्ता, लाघवी व बोलका स्वभाव ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
- आनंद देशपांडे, संस्थापक, पर्सिस्टंट सिस्टीम्स