पुणे : अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना हॉस्पिटलमध्ये मांत्रिकाला बोलावून महिला रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉ. सतीश चव्हाण याचा जबाब आरोग्य विभागाने बुधवारी नोंदवून घेतला. दुसरीकडे पोलीस मात्र त्याला पकडण्यासाठी दोन पथके रवाना केल्याचे सांगत आहेत.दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका महिलेवर मांत्रिकाकरवी उपचार करुन घेणारे डॉक्टर चव्हाण व मांत्रिकावर अलंकार पोलीस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या दोन डॉक्टरांनी चव्हाण यांच्या क्लिनिकला भेट दिली. त्यावेळी तो क्लिनिकमध्येच होता, त्याचा सविस्तर जबाब डॉक्टरांनी नोंदवून घेतला आहे, अशी माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी दिली.उपचार सुरू असताना दगावलेल्या संध्या सोनावणे यांच्यावर डॉ. चव्हाण यांच्या हॉस्पिटलमध्ये दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सोनावणे यांना छातीला दोन्ही बाजूला गाठी झाल्या होत्या. त्याचे खूप मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन झाल्याने त्यांच्या शरिरातील भाग निकामी होत गेल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली. त्यानंतर डॉ. चव्हाण यांच्या सल्ल्यावरुनच त्यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मांत्रिकाकडून उपचार; डॉक्टरचा जबाब घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 5:08 AM