चाकणच्या औद्योगिक वसाहतीत एटीएममध्ये घडवून आणलेल्या स्फोटात तब्बल २८ लाख लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 02:06 PM2021-07-22T14:06:31+5:302021-07-22T14:10:38+5:30
चाकण औद्योगिक वसाहतीतील भांबोली गावच्या हद्दीतील पिंजण यांच्या बिल्डिंगमध्ये एटीएम मशीनचा बॉम्ब सदृष्य वस्तूने स्फोट घडवून आणलं होता
चाकण : खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील भांबोली येथील वासुली फाटा - चाकण मार्गालगतच्या एका बिल्डिंगमधील एटीएम मशीनचा बॉम्ब सदृष्य वस्तूने स्फोट चोरटयांनी घडवून आणला होता. मंगळवारी मध्यरात्री घड्लेल्या या प्रकारात तब्बल २८ लाख रुपयांची रक्कम लंपास झाल्याचे समोर आले आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीतील भांबोली गावच्या हद्दीतील पिंजण यांच्या बिल्डिंगमध्ये हिताची कंपनीचे एटीएम मशीन आहे. औद्योगिक वसाहतीमधील रहदारीच्या ठिकाणी हे एटीएम मशीन असल्याने नेहमीच पैसे काढण्यासाठी लोकांची वर्दळ असते. त्यामुळे या एटीम मशिममध्ये सतत लाखो रुपयांची रक्कम भरलेली असते.
मंगळवारी रात्रौ दीड ते दोनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हिताची कंपनीचे असलेले हे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी बॉम्ब सदृष्य वस्तूने उडवून दिले. रात्रीच्या वेळी सिलेंडर फुटल्यासारखा आवाज झाल्याने मालक पिंजण यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता, समोर उभे असलेल्या चोरट्याने उसको गोली मारो अस म्हणल्यावर पिंजण आपल्या घरात गेले. त्यानंतर संबधीत चोरट्यानी काही रक्कम घेऊन पोबारा केला.
एटीएम मशीन उडवताना मोठा स्फोट घडवून आणला आहे. यामुळे एटीएम मशीनचा समोरील भाग उडून गेला आहे. तसेच एटीएम मशीनच्या समोरचा पत्रा दूर उडून पडला. तर काचांचा चक्काचूर झाला आहे. मशिनमधील काही रक्कम बाहेर फेकली गेली होती. तर मशीनच्या फुटलेल्या भागात १० ते ११ लाख रुपये सुरक्षित राहिले आहेत .
तर मशीनमधील तब्बल २८ लाख रुपये चोरीला गेले आहे. दरम्यान काळात अधिक तपास करण्यासाठी श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे अन्य सहकारी करीत आहेत.