पुणे : गेल्या महिन्याभर पावसाने लावलेल्या जाेरदार हजेरीमुळे पुणेकरांची चांगलीच दैना झाली. मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी साेमवारी आणि मंगळवारी शाळांना सुट्या देखील दिल्या हाेत्या. सातत्याने पडणाऱ्या पावसाने थाेडी तरी विश्रांती घ्यावी अशी इच्छा पुणेकर मनाेमन व्यक्त करत आहेत. पाऊस आता काहिसा कमी झाला असला तरी विविध चाैकांमध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडत आहे. पुण्यातील अनेक चाैकांमध्ये माेठ्याप्रमाणावर खड्डे पडले असून या चाैक म्हणजे एकप्रकारे चंद्राचा पृष्ठभागच झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून माेठ्याप्रमाणावर पाऊस पुण्यात पडत आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणारी सर्वच धरणे शंभर टक्के भरली आहेत. आता पाऊस काहीसा कमी झाला असला तरी जागाेजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. शहरातील अनेक चाैकांमध्ये माेठमाेठाले खड्डे पडल्याचे चित्र आहेत. पुण्यातील स्वारगेट, चाैक, सीओईपी चाैक, तसेच अभिनव महाविद्यालय चाैक, नळस्टाॅप चाैक, विद्यापीठ चाैक आदी चाैकांमध्ये माेठ्याप्रमाणावर खड्डे पडले असून वाहन चालकांची खड्डे चुकवताना चांगलीच तारांबळ उडत आहे. चाैकातच खड्डे पडले असल्याने संध्याकाळच्या वेळी वाहतूक काेंडी देखील माेठ्याप्रमाणावर हाेत आहे.
दरम्यान शहर आणि धरणक्षेत्रात पावसाचा जाेर कमी झाल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात करण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. तसेच नदीला आलेले पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.