पुणे : अन्सार शेखचा अनुभव एकट्याचा नाही. अजूनही पुण्यामध्ये धर्माच्या नावाखाली घर नाकारलं जातं. भाड्याने असो की विकत घर देताना अनेक ठिकाणी धर्माचा विचार होतो. मुस्लिमधर्मीयांना याचा त्रास जास्त होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत उजेडात आले आहे. मात्र, हे सार्वत्रिक नसून अनेक ठिकाणी सुखद अनुभवही येत असून खऱ्या अर्थाने ‘भाईचारा’ जपत असल्याचेही दिसून आले आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या अन्सार अहमद शेख याला पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर राहण्यासाठी घर मिळविण्यात मोठया अडचणींचा सामना करावा लागला. शेवटी त्याने नाव बदलल्यानंतर त्याला राहण्यासाठी जागा मिळाल्याचा कटू अनुभव त्याने मंगळवारी मांडला आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिमधर्मीयांना भाड्याने किंवा विकत घर मिळविण्यासाठी काय यातायात करावी लागते, याची पाहणी ‘लोकमत’ने केली.पेठेमध्ये कॉटबेसीसवर रूम आहे का, याची चौकशी केली असता घरमालकिणीने अनेक अटी सांगत दोन दिवसांत खोली मिळेल, असे प्रथम सांगितले. मात्र, नंतर ‘ आम्ही मुस्लिम मुलींना रूम देत नाही,’ असे सांगितले. मूळचा नगरच्या असलेल्या आणि फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये बीएला शिकत असलेला एक तरुण एक वर्षापासून सांगवी परिसरामध्ये राहण्यासाठी फ्लॅट शोधत होता. मात्र मुस्लिम असल्याच्या कारणावरून त्याला घर नाकारण्यात आले. अजूनही त्याला घर मिळालेले नाही. पंढरपूर येथून एक मुलगी पीएचडी करण्यासाठी पुण्यात आली. मात्र तिलाही घर मिळाले नाही.एका आयटी कंपनीत नोकरी करीत असलेल्या तरुणाने त्याच्या फॅमिलीसाठी सिंहगड रोड, स्वारगेट, बिबवेवाडी या परिसरामध्ये भाड्याने फ्लॅट मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही नकार देण्यात आला आहे.
अन्सारसारखे अनेक जण म्हणतात ‘घर मिळेल का घर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2016 1:38 AM