पुणे: येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयामध्ये प्रसुतीसाठी दाखल झालेल्या विवाहितेचा रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुभांगी राजाराम जानकर( वय २०, रा. भैरवनगर, धानोरी ) असे या विवाहितेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि.२२) ला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी यांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु झाल्यामुळे राजीव गांधी रुग्णालयात हा दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यानंतर शुभांगी यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु,रात्री साडेनऊ वाजता उपचारादरम्यान जानकर यांच्यासह पोटातील बाळाचा देखील मृत्यू झाला. शुभांगी यांचा शवविच्छेदन अहवाल ससून रुग्णालयाने राखून ठेवला आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. राजीव गांधी रुग्णालय हे महापालिकेचे असून अपुऱ्या सोयी सुविधांमुळे हे कायमच चर्चेत राहिले आहे.पुणे महापालिकेच्या वतीने आरोग्य विभागासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून देखील अशा घटनांची पुनरावृत्ती घडणे ही दुर्दैवी बाब आहे. शुभांगी यांचे पती राजाराम हे मजुरी करतात.या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रविकिरण दरोडे करत आहे.
वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे विवाहितेचा मृत्यू ; येरवड्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 3:53 PM
राजीव गांधी रुग्णालय हे महापालिकेचे असून सोयी सुविधांमुळे हे कायमच चर्चेत राहिले आहे.पुणे महापालिकेच्या वतीने आरोग्य विभागासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून देखील अशा घटनांची पुनरावृत्ती घडणे ही दुर्दैवी बाब आहे.
ठळक मुद्देडॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे राजीव गांधी रुग्णालयात घडलेली दुर्दैवी घटना