बाजार समितीने डाळिंब व्यापाऱ्यांना लावली ३० कोटींची वसुली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 08:24 PM2019-11-21T20:24:37+5:302019-11-21T20:39:02+5:30
शेतकरी पट्टीत घोळ
पुणे : शेतकऱ्यांच्या हिशेब पट्टीतून नियमापेक्षा जास्त कपात करणे, बाजार समितीचा सेस चुकविणे, खरेदीदाराकडून अधिक लेव्ही घेणे अशा विविध कारणांवरुन गुलटेकडी मार्केटयार्डातील चार डाळिंब व्यापाºयांच्या विरोधात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने तब्बल ३० कोटी ५५ लाख ३३ हजार ८३५ रुपयांची वसुली लावली आहे. ही रक्कम न भरल्यास सक्तीची वसुली केली जाणार असल्याचे बाजार समितीकडून स्पष्ट करण्यात आले.
के. डी. चौधरी, मे. सिद्धारूढ फ्रुट एजन्सी, मे. दिलीप बाळकृष्ण डुंबरे, मे. भास्कर नागनाथ लवटे या चार आडत्यांचे दप्तर तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. या व्यापाऱ्यांचे १ एप्रिल २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीतील पट्ट्या सनदी लेखापालाकडून तपासण्यात आल्या. त्यात अडत्यांनी हमाली, भराई, तोलाई नियमापेक्षा अधिक कापल्याचे स्पष्ट झाले. तसेच, त्यांनी खरेदीदारांकडून लेव्ही रक्कम अधिक घेतली. या शिवाय बाजार समिती शुल्क व देखरेख शुल्क कमी भरले. या कालावधीत त्यांनी तब्बल १२ कोटी २२ लाख १३ हजार ५३४ रुपयांची लुट केली आहे.
प्रशासकीय ठराव क्रमांक ६ नुसार दीडपट दंड आकारण्याचा अधिकार बाजार समितीला आहे. या रक्कमेवर दीड पट दंड आकारल्यास ही रक्कम ३० कोटी ५५ लाख ३३ हजार ८३५ होते. आडत्यांना दंडासह रक्कम भरावी लागणार आहे. अन्यथा ही रक्कम सक्तीने वसूली केली जाईल. एका अर्थाने आडत्यांनी शेतकऱ्यांसह खरेदीदार आणि बाजार समितीची फसवणूक केली असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.