पुणे : पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डाच्या आवारात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे व टपऱ्यांची बांधकामे झाली आहेत. या सर्व अनधिकृत बांधकामांवर बाजार समितीच्या वतीने कारवाई होणार असल्याची माहिती प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली. येत्या दोन दिवसांतच जेसीबीच्या साह्याने सदरचे बांधकाम तोडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रशासक गरड यांनी रविवार (दि.10) रोजी अचानक बाजार आवाराला भेट दिली. या वेळी बाजारात अनधिकृतपणे सुरू असलेले व्यवसाय, अनधिकृत बांधकामे, वाहतूक व्यवस्था आदी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी सहायक सचिव बाळासाहेब गायकवाड, तरकारी विभागाचे प्रमुख दत्तात्रय कळमकर आदी उपस्थित होते.
मार्केट यार्डात शारदा गजानन मंदिरालगत गेल्या दोन ते तीन वर्षांत सुमारे १०० ते १५० स्क्वेअर फुटांचे अनधिकृत बांधकाम बांधले आहे. त्या ठिकाणी चहाचा व्यवसाय आणि एक कुटुंब वास्तव्यास आहे. तसेच, या बांधकामाल लागून एक पान टपरी देखील लावण्यात आली आहे. हे बांधकाम प्रशासक गरड यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देत बांधकामाला सील ठेकण्याचे आदेश दिले. तसेच, दोन दिवसांत बांधकाम पाडून संबंधित टपरी हटविण्याचेही आदेश दिले. अनधिकृत बांधकामापासून वर्षाला सुमारे सव्वा लाख रूपये भाडे गणपती मंडळ घेत आहे. अनधिकृत बांधकाम हटविल्यास लहान टेम्पो लावण्यास अडथळा दूर होणार आहे. यामुळे आडत्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.