रूप पाहतां लोचनीं,सुख जालें वो साजणी..! आळंदीत माऊलींचे मंदिर दर्शनासाठी खुले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 10:17 AM2020-11-16T10:17:35+5:302020-11-16T10:18:08+5:30
Alandi Mauli Mandir : मंदिर उघडण्यावेळी दिवाळीपाडवा मुहूर्त असल्याने भाविकांची उसळणारी गर्दी लक्षात घेता मंदिरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आळंदी - दिवाळी पाडव्यापासून राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यास राज्यसरकारने परवानगी दिली आहे. यापार्श्वभूमीवर आज (दि.१६) सकाळी सहा वाजल्यापासून तीर्थक्षेत्र आळंदीतील माऊलींचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान, तमाम भाविकांना माऊलींच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. त्यातच मंदिर उघडण्यावेळी दिवाळीपाडवा मुहूर्त असल्याने भाविकांची उसळणारी गर्दी लक्षात घेता मंदिरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार मागील आठ महिन्यांपासून मंदिर बंद होते. मात्र यादरम्यान देवाचे उपचार नैमित्तिक परंपरा अखंड सुरु होते. सोशल मीडियावर दैनंदिन माउलींचे समाधी दर्शन सुरू होते. मात्र राज्य सरकारने सोमवारपासून धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. यापार्श्वभूमीवर माऊलींचे समाधी मंदिर सकाळी सहापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. दरम्यान पहाटे प्रमुख विश्वस्त अभय टिळक यांच्या हस्ते माऊलींची विधिवत महापूजा होईल.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांची प्रथम थर्मल स्कॅनिंग केली जाईल. त्यानंतर प्रत्येकाला सॅनिटाझर करून दर्शनबारीद्वारे आजोळघरातून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. पंखामंडपातून माऊलींचे मुख दर्शन झाल्यानंतर पाणदरवाज्यातून भाविकांना बाहेर सोडले जाणार आहे. साधारण दर दोन - तीन तासांनी मंदिराची स्वच्छता व सॅनिटायझेशेन केले जाणार आहे. त्यादरम्यान भाविकांना दर्शन बंद केले जाईल.
भाविकांनी मंदिरात येण्यापूर्वी रांगेतून येताना हस्तांदोलन करु नये. सोशल डिस्टन्सिंग पाळावेच. कोविड सदृश लक्षणे ज्यांना असतील, त्यांनी इतरांचे आरोग्य जपण्यासाठी मंदिर प्रवेश टाळावा. भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे.