मुंबई उपनगरात सर्वाधिक पाऊस तर बुलढाणा अजूनही तहानलेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 04:43 PM2018-07-05T16:43:13+5:302018-07-05T17:18:35+5:30
मराठवाड्यातील ८ पैकी औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी ३ जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़.
पुणे: कोकणात गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या पावसाने किनारपट्टी भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून मुंबई उपनगरात सर्वाधिक ६० टक्के पाऊस जास्त झाला आहे तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात सर्वात ३८ टक्के कमी पाऊस पडला आहे़. कोकणात सर्व जिल्ह्यात मिळून १५ टक्के अधिक पाऊस झाला असून मराठवाड्यात १६ टक्के, विदर्भात ६ टक्के अधिक पाऊस झाला आहे़. मध्य महाराष्ट्रात १ टक्का कमी पाऊस झाला आहे़. राज्यातील १० जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत कमी पाऊस झाला आहे़.
भारतीय हवामान विभागामार्फत जिल्ह्यात नोंदविण्यात आलेल्या पावसावरुन एकूण जिल्ह्यात किती पाऊस पडला, याची सरासरी काढली जाते़. त्यावरुन जिल्ह्याचा पाऊस निश्चित केला जातो़ . १ जूनपासून ४ जुलैपर्यंत कोकण, मराठवाडा व विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस झाला आहे़. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर -१३, नंदूरबार २८, नाशिक ११, सांगली -२१, सातारा -३ या पाच जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे़.
कोकणातील सर्व ७ जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस तर मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांपैकी ५ जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. मराठवाड्यातील ८ पैकी औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी ३ जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़.
राज्यातील अनेक भागात असमान पाऊस असतो़ काही ठिकाणी अधिक तर काही ठिकाणी कमी पाऊस पडतो़. पण, राज्यात सर्वत्र पर्जन्यमापक यंत्रे नसल्याने जिल्ह्यातील मोजक्या ठिकाणी पडलेला पाऊस मोजला जातो़. त्यावरुन जिल्ह्याची सरासरी काढली जाते़ त्यावरुन जिल्ह्यात साधारण किती पाऊस झाला याचा अंदाज येत असतो़.