पुण्यात लॉकडाऊन न करण्याच्या निर्णयाचे 'एमसीसीआयए'कडून स्वागत; केंद्र सरकारला करणार 'हे'आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 10:06 PM2021-04-02T22:06:10+5:302021-04-02T22:06:28+5:30
प्रशासनाला 'पीएमपी' सेवा बंद न करण्याची करणार विनंती...
पुणे : पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने पुण्यात कडक निर्बंध जाहीर केले आहे. या शहरात सकारात्मक व नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र, 'एमसीसीआए' (Maratha Chambers Of Commerce, Industries And Agriculture) ने प्रशासनाच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. तसेच प्रशासनाकडे सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेली पीएमपी बस सेवा सुरू ठेवण्याची विनंती देखील केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात ' मिनी लॉकडाऊन' जाहीर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर व्यापारी वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली असतानाच दुसरीकडे 'एमसीसीआयए'ने थेट लॉकडाऊन जाहीर न करता प्रशासनाच्या स्वीकारलेल्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.
याबद्दल बोलताना 'एमसीसीआए' अध्यक्ष सुधीर मेहता म्हणाले, आम्ही लवकरच केंद्र सरकारकडे १८ वर्षांपुढील अशा सर्वांना लसीकरण सुरू करण्याची विनंती करणार आहोत जे आपल्या कामातून देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यास मदत करतील. आणि त्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व चिंताजनक परिस्थिती असलेल्या पुण्याला प्राधान्याने लक्ष दिले जावे. तसेच कोरोना काळात कार्यरत असलेल्या प्रशासन, रुग्णालये, सामाजिक संस्था यांच्या बहुमूल्य योगदानासाठी आम्ही धन्यवाद देतो. आमच्या 'पीपीसीआर' (pune platform for covid response) च्या माध्यमातुन आम्ही १ एप्रिल रोजी १ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
प्रशांत गिरबाने म्हणाले, शहरातील पीएमपी बस सेवा सुरक्षिततेची सर्वतोपरी काळजी व मर्यादित प्रवाशांसह सुरू ठेवण्याचे आवाहन प्रशासनाला करत आहोत. त्याचे कारण म्हणजे अनेक छोट्या छोट्या कंपन्या, संस्था,वेगवेगळ्या शिफ्टस् मध्ये सुरू आहेत. तेथील असे कामगार ज्यांच्याकडे स्वतः चे वाहन नाही, या निर्णयामुळे त्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. तसेच काही कंपन्या स्वतःची खासगी वा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देत नाही त्यांनाही कामाच्या ठिकाणी ये जा करण्यात अडचण निर्माण होऊ शकते. तसेच स्थानिक व परप्रांतीय कामगारांच्या कामाच्या ठिकाणापासून सुरक्षित प्रवासाची व्यवस्था उपलब्ध करावी.
आम्ही उद्योजक कंपन्या तेथील प्रशासन, आणि नागरिकांना सरकारने कोरोना साखळी तोडण्यासाठी जे काही नियम जाहीर केले आहेत त्यांचे कटाक्षाने पालन करण्याचे आवाहन करत आहोत.