सैनिकांसाठीची औषधे बेकायदेशीरपणे खुल्या बाजारात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 06:56 PM2019-02-26T18:56:07+5:302019-02-26T18:58:06+5:30
देशातील सीमाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती एका बाजूला आत्मीयता व्यक्त करीत असतानाच त्यांच्यासाठी असलेल्या जीवनावश्यक औषधांवर डल्ला मारणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे आढळून आले आहे.
पुणे : देशातील सीमाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती एका बाजूला आत्मीयता व्यक्त करीत असतानाच त्यांच्यासाठी असलेल्या जीवनावश्यक औषधांवर डल्ला मारणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. अन्न व औषध विभागाने केलेल्या तपासात आढळून आले आहे. विश्रामबाग, मुंढवा आणि अलंकार पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी विवेक खेडकर यांनी फिर्याद दिली आहे. शंशाक फार्मा व सर्जिकल शॉप (निर्मल विश्व हाईटस, सदाशिव पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानाचे नाव आहे. तेथे हा प्रकार १ एप्रिल २०१८ पासून सुरु होता. संरक्षण दलातील सैनिकांसाठी व सरकारी रुग्णालयात येणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांसाठी शासन औषध कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर एक गठ्ठा औषधांची खरेदी करते. या औषधांच्या स्टिप व बाटल्यांवर तशी सुचना लिहिलेली असते. अन्न व औषध विभागातील अधिकाऱ्यांनी शंशाक फार्मा व सर्जिकल शॉप या दुकानातील खरेदी विक्री बिलांच्या तपशीलावरुन त्यांनी ही खुल्या बाजारात विकण्यास बंदी असलेली औषधांची विक्री केली असल्याचे आढळून आले.
त्यात januvia 100mg या शासकीय वापरासाठी असणाऱ्या औषधांची बेकायदेशीरपणे खरेदी व विक्री करुन शासनाची फसवणूक केली आहे. अशाप्रकारे काही दिवसांपूर्वी मुंढवा येथील रॉयल फार्मा या दुकानामध्येही याच औषधांचा २ लाख ८५ हजार रुपयांचा साठा आढळून आला होता. मुंढवा पोलिसांनी निरजकुमार सिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संरक्षण दलातील सैनिकांसाठी तसेच शासनाच्या रुग्णालयातील औषधे चोरुन ती बेकायदेशीरपणे खुल्या बाजारात विकण्याचे हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या औषधांवर केवळ शासकीय वापरासाठी असा मजूकर लिहिलेला असतो. तो खोडून त्याची खुल्या बाजारात विक्री केली जात आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बी़ एम़ रायकर अधिक तपास करीत आहेत.