हिंजवडीतील समस्यांबाबत मुंबईत बैठक; गिरीष बापट, सुभाष देसाई, सौरभ राव राहणार उपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 02:46 PM2017-12-06T14:46:59+5:302017-12-06T14:55:41+5:30
हिंजवडी येथील वाहतूककोंडी तसेच अन्य समस्यांबाबत मुंबईत मंत्रालयात गुरूवारी (दि. ७) बैठक होत आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी पुढाकार घेतला असून उद्योगमंत्री सुभाष देसाई हेही यावेळी उपस्थित असणार आहे.
पुणे : हिंजवडी येथील वाहतूककोंडी तसेच अन्य समस्यांबाबत मुंबईत मंत्रालयात गुरूवारी (दि. ७) बैठक होत आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी पुढाकार घेतला असून उद्योगमंत्री सुभाष देसाई हेही यावेळी उपस्थित असणार आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह सर्व संबधितांना या बैठकीसाठी मुंबईत बोलावण्यात आले आहे.
हिंजवडी या आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर रोज वाहतुकीची कोंडी होत असते. स्थानिक कंपन्यांच्या प्रमुखांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या कर्मचाऱ्यांना याचा त्रास होत आहे. बापट यांनी यापूर्वीही या विषयावर स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी रस्ता रुंदीकरण, सुरक्षा व्यवस्था, वाहनतळ, घनकचरा व्यवस्थापन अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाली. या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी व स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.
रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल, पर्यायी रस्ते असे काही विषय राज्य सरकारशी, विशेषत: उद्योग विभागाशी संबधित आहेत. तसेच रुंदीकरणात बाधित होणाऱ्यांना नुकसान भरपाई असेही काही विषय राज्य सरकारशी संबंधित आहेत. त्यामुळे बापट यांनी उद्या मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही या बैठकीला संमती दर्शवली असून विधानपरिषदेसाठी मतदान होत असतानाही बापट यांनी ही बैठक आयोजित केली आहे.