मोहोळच्या खूनापूर्वी महिनाभर आधी आरोपी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांच्यात मिटिंग
By नम्रता फडणीस | Published: January 16, 2024 08:01 PM2024-01-16T20:01:53+5:302024-01-16T20:03:00+5:30
विठ्ठल शेलार आणि गुन्हयातील फरार आरोपी गणेश मारणे हे दोन मुख्य सूत्रधार
पुणे : गुंड शरद मोहोळच्या खून प्रकरणी विठ्ठल शेलार आणि गुन्हयातील पाहिजे आरोपी गणेश मारणे हे दोन मुख्य सूत्रधार आहेत. शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना आधी मिटिंग घेतली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली.
शरद मोहोळ खून प्रकरणात विठ्ठल महादेव शेलार (वय-३६), रामदास उर्फ वाघ्या नानासाहेब मारणे (वय ३६, दोघेही रा. मुळाशी) यांना अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरा मुख्य सूत्रधार गणेश मारणे हा फरार झाला असून पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी ५ जानेवारी रोजी शरद मोहोळचा गोळ्या झाडून खून केला होता. याप्रकरणात आता पर्यंत १५ आरोपीना अटक करण्यात आली आहे. तसेच ८ ते ९ जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस सहआयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले की, कट रचणे हा गुन्हयातील मुख्य भाग आहे. शरद मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना आधी विठ्ठल शेलार आणि पाहिजे आरोपी गणेश मारणे यांच्यात मिटिंग झाली. विठ्ठल शेलारवर कलम ३०२, कलम ३०७ आणि खंडणीचे १७ गुन्हे दाखल आहेत. तसेच रामदास मारणे हा सुद्धा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांच्यात मिटिंग कुठे झाली? त्यावेळी अजून कोण कोण उपस्थित होते, तसेच एक वाहन जप्त करायचे असल्याने आरोपींची ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. सरकारी पक्षाच्या वतीने नीलिमा इथापे-यादव, फिर्यादीच्या वतीने अँड गोपाळ भोसले यांनी बाजू मांडली. तर आरोपींच्या वतीने डी. एस. भोईटे आणि लोक अभिरक्षक कार्यालच्या रोहिणी लांघे यांनी बाजू मांडली. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून दोन्ही आरोपीना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.