लोकमत न्यूज नेटवर्क
खेड शिवापूर : शिवगंगा खोऱ्यातील प्रस्तावित रिंगरोडला होत असलेला विरोध व प्रशासनाकडून दडपशाही पद्धतीने करण्यात येणाऱ्या कारवाया यासंदर्भात योग्य ती माहिती घेऊन शेतकरी व प्रशासन यांच्यामध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासंदर्भात लवकरच शेतकरी कृती समिती व प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात येईल. या बैठकीमध्ये रिंगरोडसंदर्भात पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत मोजणी प्रक्रिया करू नये, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाला केल्या.
सोमवारी कोंढणपूर याठिकाणी त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्या बोलत होत्या. कुठल्याही भागात होणारे मोठमोठे प्रकल्प हे त्या भागाच्या विकासासाठी उपयुक्त असतात मात्र ते प्रकल्प करताना तेथील शेतकऱ्यांची स्थानिकांची ज्या काही शंका असतील त्यांचे निरसन होणे गरजेचे आहे. प्रशासनाला दडपशाही करता येणार नाही. शेतकऱ्यांच्या शंका निरसन करून त्यांना विश्वासात घेऊनच असे प्रकल्प पूर्ण होतात. रिंगरोडला होणारा विरोध हा प्रशासन व बाधित शेतकरी यांच्यामधील गैरसमज असावा असे वाटते. हाच गैरसमज काढण्यासाठी लवकरच शेतकरी, प्रशासन व जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची एकत्रित एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे. त्यातून योग्य तो सकारात्मक निर्णय काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सुळे म्हणाल्या.
उपस्थित शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडताना प्रशासन कशाप्रकारे दडपशाही करत आहे, त्यांच्यावर प्रशासनातर्फे कसा अन्याय होत आहे याची माहिती सुळे यांना दिली. आतापर्यंत कुठल्याही प्रकारची योग्य माहिती आमच्या पर्यंत पोहोचवली नाही व बळाच्या जोरावर आमच्या जमिनी घेऊ पाहात आहेत ते आम्ही होऊ देणार नाही. प्रसंगी आम्ही उपोषण करू, आपण आमच्या लोकप्रतिनिधी आहात, आपणच आमची व्यथा समजू शकता, आपणच यातून मार्ग काढावा अशी विनंती या वेळी शेतकऱ्यांनी केली.
चौकट
हा प्रकल्प दादांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे असे बोलले जात आहे. मात्र, जिल्ह्याच्या प्रगतीसाठी विकासासाठी जे जे प्रकल्प चालू आहेत ते सर्वच दादांचे ड्रिम प्रोजेक्ट आहेत. या प्रकल्पाला आमचा विरोध नाही, पण तो होत असताना तो सुपीक जमिनीऐवजी डोंगराच्या बाजूने व्हावा रिंगरोड बंदिस्त नसावा व बाधित शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन मिळावी, या आमच्या मागण्या आहेत.
- स्थानिक शेतकरी
फोटो ; रिंगरोड विरोधात खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देताना शेतकरी व स्थानिक नागरिक.