पुण्यातील शुक्रवार पेठेत २ लाखांचे मेफेड्रोन जप्त, चौघांना अटक
By नितीश गोवंडे | Published: November 1, 2023 01:15 PM2023-11-01T13:15:47+5:302023-11-01T13:17:11+5:30
मिलिटरी इंटेलिजन्स आणि गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शुक्रवार पेठेतील स्नेहदिप बंगल्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावर कारवाई केली
पुणे : मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथक १ यांच्या संयुक्त विद्यमाने २ लाख १४ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले. याप्रकरणी चार जणांना अटक केली असून त्यांच्याडून ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शुक्रवार पेठेतील स्नेहदिप बंगल्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली.
रोनीत बिपीन खाडे (१९, रा. सिंहगड रोड, हिंगणे), चैतन्य शिवाजी सावले (२७ रा. कमलग्रीन लिप सोसायटी, किरकिटवाडी), सार्थ विरेंद्र खरे (१९, रा. आनंदनगर, सिंहगड रोड) आणि विशाल कमलेश मेहता (१९, रा. सिंहगड रोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अनुष जोतिबा माने (रा. घोरपडी पेठ) याचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लक्ष्मण घोरपडे यांनी फिर्याद दिली असून, खडक पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलिस अधिकारी व कर्मचारी खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना शुक्रवार पेठेतील स्नेहदिप बंगल्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावर चार जण संशयितरित्या आढळून आले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २ लाख १४ हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम ७० मिलीग्रॅम मेफेड्रोन पावडर आढळून आली. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी विक्री करण्यासाठी हे ड्रग्ज बाळगल्याचे सांगितले. तर अनुष माने याच्याकडून आरोपींनी हे ड्रग्ज विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. चौघांकडून एमडी पावडर आणि चार मोबाइल असा एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.