पारा पस्तिशीपार, उन्हाळ्याची चाहूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:12 AM2021-03-14T04:12:30+5:302021-03-14T04:12:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : होळी अजून दोन आठवड्यांवर असतानाच मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. शनिवारी (दि. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : होळी अजून दोन आठवड्यांवर असतानाच मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. शनिवारी (दि. १३) तापमानाचा पारा ३५.६ अंश सेल्सिअस नोंदला गेला. दुपारच्या वेळी कडक उन आणि अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्याचा अनुभव पुणेकरांना येऊ लागला आहे. येत्या दोन दिवसात कमाल तापमानात आणखी वाढ होऊन ते ३७ अंशांवर पोहोचण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी पुण्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. दुपारी दोननंतर शहराच्या काही भागात ढगाळ हवामान देखील होते. मात्र पावसाचा टिपूसही पडल्याची नोंद शहरात झाली नाही.
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानाचा पारा चढण्यास सुरूवात झाली. दुपारच्या उन्हाच्या झळांचा परिणाम रस्त्यांवर तुरळक गर्दीच्या रुपात दिसू लागला आहे. नीरासारख्या थंड पेयांची विक्री, ऊस रसपान गृहे येथील गर्दी वाढू लागली आहे. शहाळे, कलिंगड, खरबूज या तहान भागवणाऱ्या फळांची मागणी वाढली आहे. मास्कसोबतच टोप्या, गॉगल, खरेदीकडे पुणेकरांची पावले वळत आहेत. थंड पाण्यासाठी फ्रीज, माठ यांच्या विक्रीला उठाव येऊ लागला आहे. पंखे, कुलर, एअर कंडिशन अशा थंडगार करणाऱ्या उपकरणांच्या दुकानांमधली गर्दी वाढू लागली आहे. पुढील दोन दिवस शहरातील हवामान कोरडे राहाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.