'कोरोना' संदर्भात सोशल मीडियावर फिरणारा ‘तो’ मेसेज तथ्यहीन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 06:22 PM2020-02-01T18:22:37+5:302020-02-01T18:29:14+5:30
'' कोरोना'' विषाणुपासून बचावासाठी कोणतीही शीतपेये, आईस्क्रीम, सीलबंद दुध तसेच ४८ तासांपुर्वी दुधापासून तयार केलेली मिठाईचे सेवन करू नये’....
पुणे : '' कोरोना'' विषाणुपासून बचावासाठी कोणतीही शीतपेये, आईस्क्रीम, सीलबंद दुध तसेच ४८ तासांपुर्वी दुधापासून तयार केलेली मिठाईचे सेवन करू नये’, असा सोशल मिडियावर फिरणारा मेसेज तसेच एका खासगी कंपनीचे पत्रकातील मजकुर तथ्यहीन असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या साथरोग व संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले आहे. ही माहिती अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
चीनमध्ये कोरोना विषाणुचा फैलाव वेगाने होत आहे. भारतात केरळमध्येही एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे कोरोनाविषयी लोकांच्या मनात भिती निर्माण होऊ लागली आहे. त्यातच सोशल मिडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती देणारा मजकुर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. तसेच अजमेर येथील एका खासगी कंपनीच्या आरोग्य अधिकाऱ्याचे कोरोनासंदर्भातील उपाययोजनांबाबतचे पत्रकही एकमेकांना पाठविले जात आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्युएचओ) या सुचना असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. त्यामध्ये स्वच्छतेबाबत देण्यात आलेल्या सुचना मात्र योग्य आहेत.
‘कोरोना विषाणु भारतातही येण्याचा धोका आहे. यापासून बचावासाठी जागतिक आरोग्य संघटनेने काही बाबतीत खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. कोणत्याही प्रकारची शितपेये, आईस्क्रीम, कुल्फी आदी खाऊ नये. कोणत्याही प्रकारे बंद डब्यातील जेवण, जुनाट बर्फगोळा, सीलबंद दुध तसेच ४८ तासांपुर्वी दुधापासून बनविलेली मिठाई खाऊ नये. कमीतकमी पुढील ९० दिवस या सुचनांचे पालन करावे’, असा मजकुर सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ही माहिती अत्यंत चुकीची असल्याचे डॉ. गंगाखेडकर यांनी म्हटले आहे.
---------------