#MeToo: ‘गुड टच, बॅड टच’ मोहिमेने महिला सक्षमीकरणाला बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:22 AM2018-10-26T01:22:06+5:302018-10-26T01:22:59+5:30
लोकमत विमेन समीटचे हे सातवे पर्व. ‘तीची बोलण्याची ताकद’ ही संकल्पनाच क्रांतिकारी आणि समयोचित आहे.
- डॉ़ उषा काकडे
लोकमत विमेन समीटचे हे सातवे पर्व. ‘तीची बोलण्याची ताकद’ ही संकल्पनाच क्रांतिकारी आणि समयोचित आहे. लोकमत वुमेन समीटच्या निमित्ताने देशभरातील कर्तृत्ववान महिलांना एकत्र आणून त्यांच्या विचारांचा जागर घडवून आणत आहेत. आजपर्यंत या वुमेन समीटच्या माध्यमातून अनेक विषयांवर चर्चा घडली. विचारमंथन झाले.
‘लोकमत वुमेन समीट’ने गेल्या सहा वर्षांत महिलांच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ दिले. अनेक विषयांवर चर्चा घडली. विचारमंथन झाले. नोकरदार महिलांच्या प्रश्नांपासून कर्तृत्वाचे शिखर सर करणाऱ्या हिरकणींपर्यंत अनेक विषय हाताळले गेले. त्याचबरोबर काही कळीच्या प्रश्नांना हात घातला गेला. मंगळसूत्र विकून स्वच्छतागृह उभारणाºया अकोला जिल्ह्यातील महिलांना ‘वुमेन समीट’मुळे व्यासपीठ मिळाले. राज्य पातळीवर हा प्रश्न चर्चिला गेला.
महिला बोलत्या झाल्या पाहिजेत, समस्यांना धाडसाने सामोरे गेल्या पाहिजेत, अशा प्रकारचे वातावरण आपण बनविले पाहिजे. लोकमत वुमेन समीटने आजपर्यंत विचारमंथन घडवितानाच प्रश्नांना उत्तरे शोधण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यातून समाजात अनेक सकारात्मक बदल घडले आहेत.
त्याचबरोबर, मला आणखी एका विषयाकडे लक्ष वेधावेसे वाटते. अनेक चिमुरड्याही लैंगिक अत्याचारांना बळी पडतात. त्यांना आपल्यावर अत्याचार झाल्याचे कधी-कधी समजतही नाही आणि सांगताही येत नाही. त्यांच्यासाठी यूएसके फाउंडेशन ‘गुड टच, बॅड टच’ मोहीम राबवीत आहे. बाललैंगिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनेकदा बाललैंगिक अत्याचारात घरातील, नात्यातील व्यक्तींचाही समावेश असतो. त्यामुळे मुळात अशा वाईट स्पर्शाचे ज्ञान विशेषत: मुलींना व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार हा गंभीर विषय असून त्याबद्दल जागृती करण्यासाठी मुलांना लहान वर्गांपासूनच धडे दिले पाहिजेत. मुलांना ‘गुड टच, बॅड टच’ची जाणीव व्हावी, यासाठी शाळांनीही प्रशिक्षण वर्ग आयोजित केले पाहिजेत. यूएसके फाउंडेशनने पुण्यातील अनेक शाळांमध्ये यावर जागृती केली. त्यातून अनेक मुली बोलत्या झाल्या. यातून अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.
महिलांच्या प्रश्नांवर राष्टÑीय पातळीवर चर्चा करताना सगळ्या प्रश्नांना विविधांगांनी भिडले पाहिजे. आपण सर्वांनी लोकमत वुमेन समीटच्या माध्यमातून हा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
(अध्यक्ष, यूएसके फाउंडेशन)