पुणे : गणेशोत्सवामध्ये विसर्जन मिरवणुकीस अनन्यसाधारण महत्व आहे. कोरोना आपत्तीमुळे विसर्जन मिरवणूक होत नसली, तरी भविष्यात ती पुन्हा त्याच जोमात होणार आहे़ परंतु, सध्या लकडी पुलावरून नियोजित असलेला मेट्रोचा पूल हा गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठा अडथळा ठरणार असून, याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
गणेश विसर्जन मिरवणूक हा पुणेकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे़ पुणे शहरात मेट्रोचे काम प्रगतिपथावर असून, लकडी पूल, डेक्कन येथून मेट्रो मार्गाच्या पुलाचे काम सध्या चालू आहे. हा पूल लकडी पुलापासून ५.४५ ते ६ मीटर (सुमारे २० फूट) इतका उंच असल्याने, हा मेट्रोचा पूल झाल्यास विसर्जन मिरवणुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होणार आहे. विसर्जन मिरवणुकीतील रथ, रोषणाई यांची उंची साधारण ३५ फूट ते ४५ फुटापर्यंत असल्याने, या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी गणेश मंडळांकडून होत आहे.
या पार्श्वभूमीवर लकडी पुलावरील मेट्रो पुलाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मेट्रोचे अधिकारी, महापालिका प्रशासन व पक्षनेते यांची बैठक बोलावून यातून मार्ग काढावा़, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
-------------------------------