बारामती : 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत' अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येेष्ठ नेेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी पडळकर यांच्या विरुद्ध आंदोलने करण्यासोबतच संतापजनक प्रतिक्रियांची झोड उठवली गेली. मात्र, दुुुसरीकडे उंडवडी कडेपठार (ता. बारामती) येथे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला रविवारी (दि. २८) भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा अभिषेक घालत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या प्रकारानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापरकेल्यानंतर राज्यभरातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावर खुद्द शरद पवारांनी पडळकर हे दोनदा अनामत जप्त झालेली व्यक्ती आहे.. उगीच महत्व देऊ नका अशा शेलक्या शब्दात टीका केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लायकी पाहून बोलावं, सूर्यावर थुंकले तर ती थुंकी आपल्यावरच पडते असे म्हणत पडळकर यांना लक्ष्य केेेेले होते. याप्रकारे गेले काही दिवस भाजप व राष्ट्रवादी यांच्यामध्ये जोरदार शाब्दीक चकमक सुरू असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
रविवारी सकाळी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धअभिषेक करत त्यांच्या समर्थनार्थ भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीसह भाजपच्याही बड्या नेत्यांनी या प्रकरणी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. बारामतीत भाजपच्या तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांनी यात पडळकर यांची पाठराखण करत त्यांना समर्थन दिले. या प्रकारानंतर सहा प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना तालुका पोलिस ठाण्यात नेले आहे. तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके,जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, युवामोर्च अध्यक्ष अॅड. ज्ञानेश्वर माने, उपाध्यक्ष जयराज बागल, विशाल कोकरे, प्रकाश मोरे, प्रमोद खराडे, भाऊसाहेब मोरे व इतर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित केले.