पुणे/अहमदनगर/सोलापूर : दूध पावडर व बटरचे वाढलेले दर, वाढती मागणी व कमी उत्पादन, पशुखाद्य, इंधन दरवाढीमुळे दूध व्यवसाय करणे शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. यामुळेच दूध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने दूध खरेदी दरामध्ये ३ रुपयांची, तर दूध विक्री दरामध्ये २ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना ३ रुपयांचा फायदा होईल; तर ग्राहकांना २ रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.
राज्यातील सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची बैठक कात्रज दूध संघ येथे घेण्यात आली. या बैठकीत गाईच्या दुधाचा दर ३० वरून ३३ रुपये प्रति लिटर, तर म्हशीच्या दुधाच्या खरेदीचा दर ५० वरून ५२ रुपये प्रति लिटर करण्याचा निर्णय घेतल्याचे कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी सांगितले. यावेळी सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांचे ४७ प्रतिनिधी उपस्थित होते.
खरेदी दरात यापुढे वाढ करण्यापेक्षा अतिरिक्त दूध होते तेव्हा प्रति लिटर ३० रुपयांपेक्षा कमी दर दूध उत्पादकांना द्यायचा नाही, असा ठोस निर्णय सर्वांनी घ्यायला हवा. तरच शेतकऱ्यांना सतत चांगला दर मिळत राहील. कोणी ३०, कोणी ३१ तर कोणी ३३ रुपये दर देते. दूध खरेदीचा समान ३३ रुपये दर राहावा. - प्रकाश कुतवळ, सदस्य, राज्य दूध उत्पादक कल्याणकारी संघ